नोकरीच्या आमिषाने ७.६९ लाखांची फसवणूक : वरणगाव पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी)-

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सुपरवायझर, ज्युनिअर क्लार्क व वॉर्डबॉय पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ७ लाख ६९ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार वरणगाव येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अतुल शिवाजीराव शेटे (वय ४८, रा. अजय नगर, वरणगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी हे वरणगाव येथील एका वरिष्ठ महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत आहेत. तक्रारीनुसार नेहा निनाद नाईक (रा. पुणे) या महिलेने पुणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांवर भरती करून देण्याचे आश्वासन दिले होते.

आरोपी महिलेने फिर्यादी अतुल शेटे तसेच त्यांच्या नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी पैसे उकळले. यामध्ये फिर्यादी अतुल शेटे यांच्याकडून ४ लाख ८० हजार रुपये, तर श्रद्धा शेटे, श्रद्धा जोशी, रेणुका महाजन व विजय घौसास या व्यक्तींकडून २ लाख ८९ हजार रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारे एकूण ७ लाख ६९ हजार रुपयांची रक्कम आरोपीने स्वीकारली.

मात्र पैसे देऊनही कोणालाही नोकरी मिळाली नाही, तसेच दिलेली रक्कमही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. हा प्रकार ८ ऑगस्ट २०२३ ते ६ मार्च २०२४ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीच्या तक्रारीवरून २ जानेवारी २०२५ रोजी वरणगाव पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवले (मुक्ताईनगर) यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी हे पुढील तपास करत असून, संशयित आरोपी नेहा नाईक हिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान, नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्यांमुळे बेरोजगार तरुणांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत असून, अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.