भुसावळच्या पाणी प्रश्नावरून नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व संतोष चौधरींचा भाजपवर हल्लाबोल : दुध का दुध, पाणी का पाणी” – पत्रकार परिषदेत आरोपांचे खंडन

भुसावळ (प्रतिनिधी):
भुसावळ शहरातील पाणी प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले असून, भाजपकडून होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी भाजपने केलेले आरोप फेटाळून लावत सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली आणि भाजपवर जोरदार टीका केली.

भुसावळातील पाणी प्रश्नावरून भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत तीन महिन्यांपासून पाण्याच्या टाकीचे काम बंद असल्याचा आरोप केला होता. यावर काल मंत्री सावकारे यांनी कुणाच्या तरी फोनमुळे काम बंद झाल्याचा आरोप केला. मात्र, या आरोपांना नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि संतोष चौधरी यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला.

नगराध्यक्षा गायत्री भंगाळे म्हणाल्या की, दीर्घकाळ सत्तेत असताना भाजपला ना मुख्याधिकारी दिसले, ना शहरातील समस्या. निवडणुकीतील पराभवानंतर अचानक पाणी प्रश्नाची आठवण होणे हे राजकीय दुटप्पीपणाचे लक्षण आहे. भाजपकडून माझ्यावर व मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असून पाणीपुरवठ्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. हा दबाव आपण सहन करणार नसून, गरज पडल्यास पोलिसांत तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले की, पाण्याच्या टाकीचे काम कुणाच्या फोनमुळे बंद झाले, हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. कामातील तांत्रिक अडचणी दूर करून प्रकल्प पूर्ण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नगरपालिका निवडणुकीचा निकाल २२ डिसेंबरला लागला आणि २४ डिसेंबरला नगराध्यक्षा कार्यभारात आल्या. जर काम तीन महिन्यांपासून बंद असेल, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, हे भाजप नगरसेवकांनी तपासावे, असे आव्हान त्यांनी दिले.

चौधरी यांनी पुढे गंभीर आरोप करत सांगितले की, आठवडे बाजारातील जागा व्यापारी संकुलासाठी योग्य असताना तेथे पाण्याची टाकी उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. टाकीच्या कामातील माती संतोषी माता सभागृहाजवळील जागेवर टाकून ती जागा बळकावण्याचा प्रकार एका पदाधिकाऱ्याकडून सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच अमृत-२ योजनेतील १०० कोटी रुपयांचे काम आपल्या समर्थकाला मिळावे यासाठी मंत्र्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

भुसावळकर जनतेला राजकारण नको असून वेळेवर शुद्ध पाणी हवे आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी अल्प काळातच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली असून जनता समाधानी आहे. कुणीही दादागिरी करू नये, असा इशाराही संतोष चौधरी यांनी दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रतोद उल्हास पगारे यांनी शहरात वाढलेल्या गुन्हेगारीमागे कोणत्या अदृश्य शक्ती कार्यरत आहेत, याचा शोध घ्यावा, असा टोला भाजपला लगावला.

या पत्रकार परिषदेला नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, माजी आमदार संतोष चौधरी, गटनेते सचिन चौधरी, उपगटनेते सोहेल खान पठाण, प्रतोद उल्हास पगारे, मुख्य समन्वयक प्रा. उत्तम सुरवाडे तसेच नगरसेवक अकिल पिंजारी, सिकंदर खान, अमीन कुरेशी, सचिन पाटील, इम्रान बागवान, नदीम मेंबर यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.