भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात कला मंडळाच्या वतीने ‘नृत्य स्वरांजली’ स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहनभाऊ फालक यांच्या हस्ते झाले.

या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी गीतगायन, मराठी व मल्याळम गीत, लावणी, सिनेगीत, अहिराणी गीत, गोंधळ, शिवछत्रपतींवरील गीत तसेच विविध लोकनृत्य व नृत्यप्रकार सादर करून प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली. नृत्य, गायन व वादनाच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे प्रभावी दर्शन घडले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन महेशभाऊ फालक, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. एन. पाटील व प्रा. डॉ. जी. आर. वाणी, कला मंडळ प्रमुख प्रा. स्मिता बेंडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. मोहनभाऊ फालक यांनी स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते व अभ्यासात सातत्य राखण्याची प्रेरणा मिळते, त्यामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक व सांस्कृतिक आलेख उंचावतो, असे मत व्यक्त केले.
यानंतर युथ फेस्टिवल, इंद्रधनुष्य तसेच महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार मंडळ आयोजित लोकनृत्य स्पर्धांमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच कला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष संजय कुमार नाहाटा व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून माजी हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. रेखा गाजरे व वाणिज्य व व्यवस्थापन संशोधक केंद्र समन्वयक डॉ. रश्मी शर्मा यांनी काम पाहिले. प्रास्ताविक प्रा. स्मिता बेंडाळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. चंद्रकांत सरोदे व प्रा. पूनम महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



