भुसावळ ( प्रतिनिधी ) –
राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन, भुसावळ यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम व शैक्षणिक साहित्य संकलन उपक्रम नुकताच दि. ३ जानेवारी २०२६ रोजी शहर पोलीस स्टेशनजवळ, जुन्या प्रांत कार्यालयासमोर भुसावळ येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन भुसावळ शहराच्या नगराध्यक्षा सौ. गायत्रीताई भंगाळे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. अध्यक्षस्थानी भुसावळचे उपविभागीय अधिकारी केदार बारबोले होते. प्रमुख पाहुणे म्हणून शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक उध्दव डमाळे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ, तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश गायकवाड, कम्युनिटी नगरपालिका येथील अलका दशके, डॉ. कैलास ठाकरे, भुसावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी, नगरसेवक उल्हास पगारे, नगरसेविका प्राची पाटील, ॲड. प्रिया अडकमोल, ॲड. किश्णा सिंग व डॉ. टी. के. सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत फाउंडेशनच्या वतीने पेन व डायरी देऊन करण्यात आले.
फाउंडेशनच्या अध्यक्षा राजेश्री सुरवाडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, हा उपक्रम सलग ११ व्या वर्षी राबविण्यात येत असून मागील दहा वर्षांपासून सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादनासोबत शैक्षणिक उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत संकलित होणारे शैक्षणिक साहित्य एप्रिल महिन्यात महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भुसावळ तालुक्यातील एका गावातील अतिशय गरीब, आई-वडील नसलेल्या इयत्ता ५ वी ते १० वी मधील ४० विद्यार्थ्यांना ‘अवनी दत्तक योजना’ अंतर्गत एक वर्षासाठी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नगराध्यक्षा सौ. गायत्रीताई भंगाळे यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका व शिक्षिका असून महिलांच्या शिक्षणासाठी त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे नमूद केले. फाउंडेशनचा उपक्रम कौतुकास्पद असून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी होईल ती मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. नगरसेवक उल्हास पगारे, प्रा. उत्तम सुरवाडे व ॲड. किश्णा सिंग यांनीही मनोगत व्यक्त करून उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन स्वरूपात शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत दिली. दिवसभरात ४० शाळेच्या बॅगा, ४० भरलेले कंपास बॉक्स, २३५ पेन, ३४७ (२०० पानांच्या) वह्या, २४ (१०० पानांच्या) वह्या, २६ लेटरपॅड तसेच सुमारे ६,७०० रुपये इतकी आर्थिक मदत जमा झाली. भुसावळसह साकरी, सावदा, धानोरा, नगर व साकेगाव येथूनही दात्यांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनच्या अध्यक्षा राजेश्री सुरवाडे, सचिव निर्मला सुरवाडे, सुजाता सपकाळे, माधुरी सपकाळे, प्रमिला लोखंडे तसेच सर्व पदाधिकारी व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले. फाउंडेशनच्या वतीने सर्व दात्यांचे आभार मानण्यात आले.


