गण गण गणात बोतेच्या जयघोषात भुसावळ दुमदुमले; साकळी–शेगाव पदयात्रेचे उत्साहात स्वागत

(भुसावळ प्रतिनिधी)

गेल्या १५ वर्षांची परंपरा जपत साकळी (ता. यावल) येथून निघालेली संत गजानन महाराजांची पदयात्रा रविवारी भुसावळ शहरात दाखल होताच संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ठिकठिकाणी भाविकांनी या पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती.

यावल मार्गे शहरात प्रवेश केलेल्या या पदयात्रेचे गांधी पुतळा, तहसील कार्यालय, सहकार नगर व गोपाळ पोलीस चौकी परिसरात जंगी स्वागत करण्यात आले. पदमावती अपार्टमेंट परिसरात भाविकांनी पदयात्रेवर पुष्पवृष्टी केली. यावेळी महाराजांच्या पादुकांची मनोभावे आरती करण्यात आली. हा भक्तीचा सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

पदयात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे आकर्षक लाईटिंगने सजवलेला ‘महाराजांचा रथ’ होय. रात्रीच्या सुमारास झगमगाटात न्हाऊन निघालेला हा रथ भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. रथासमोर नतमस्तक होत असताना १०० हून अधिक पदयात्रींच्या मुखातून निघणारा “गण गण गणात बोते” हा जयघोष वातावरणात चैतन्य निर्माण करत होता.

साकळी येथून दरवर्षी शेगावपर्यंत ही पदयात्रा काढली जाते. यंदा या पदयात्रेचे १५ वे वर्ष असून शिस्तबद्ध नियोजन, एकसारखा गणवेश आणि भक्तीची ओढ यामुळे ही यात्रा विशेष ठरत आहे. शहरातील विविध ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर ही पदयात्रा रात्रीच्या मुक्कामासाठी ‘लोणारी हॉल’ येथे विसावली.

भाविकांच्या श्रद्धेने व शिस्तीत निघालेली ही पदयात्रा सोमवारी शेगावकडे मार्गस्थ होणार असून, भुसावळकरांसाठी हा अनुभव अत्यंत सुखद व आध्यात्मिक ठरला.