भुसावळ (प्रतिनिधी): महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडींची मालिका कायम असून, अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ मधून शिवसेनेचे उमेदवार गौरव चंद्रकांत सोनवणे हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा होताच महानगरपालिका परिसरात जल्लोष साजरा केला.

भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांच्या बिनविरोध निवडीनंतर शिवसेनेलाही या प्रभागात बिनविरोध यश मिळाले आहे. प्रभाग १८ ‘अ’ मधील निवडणूक प्रक्रियेत मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने गौरव सोनवणे यांचा मार्ग मोकळा झाला.
डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे हे चोपडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र असून, सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील कार्यामुळे त्यांची प्रभागात ओळख आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील या बिनविरोध निवडीमुळे शिवसेनेचे मनोबल उंचावले असून, महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या यशात आणखी भर पडली आहे.


