नांदेड : प्रेमसंबंधांना विरोधातून नांदेडमध्ये घडलेल्या थरारक हत्येने जिल्हा हादरला आहे. सक्षम नावाच्या तरुणाची वडील आणि भावांनी गोळ्या झाडून हत्या केली असून, हा खून थेट प्रेमसंबंधांवरून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. गुरुवारी संध्याकाळी इतवारा परिसरात ही घटना घडली.

हत्येनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांनी आरोपींची नावे जाहीर केली. त्यात हिमेश गज्जनन मामिडवार, सोमेश सुभाष लखे (२०), जय ठाकूर उर्फ मामिहार (४३), गजानन मानिडकर (४४), सहित ठाकूर (२५) आणि सारंडांत कुचेकर (१८) यांचा समावेश आहे.
सक्षम आणि संबंधित मुलीच्या प्रेमसंबंधांना तिच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. दोन्ही बाजूंचे भाऊ मित्र असल्याने घरात ये-जा होती आणि त्यातूनच तीन वर्षांची त्यांची प्रेमकहाणी फुलली. मात्र घरच्यांच्या विरोधात दोघे एकत्र राहण्याचा निर्णय घेत असताना संतापाच्या भरात मुलीच्या वडील व भावांनी सक्षमवर तीन गोळ्या झाडल्याचे उघड झाले.
शुक्रवारी मृतदेह घरासमोर आणल्यावर हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग घडला. प्रियकराच्या कपाळावर कुंकू लावून त्या मुलीने त्याच्या हातात हात घालून प्रतिकात्मकरित्या ‘सातजन्माची गाठ’ बांधली. “माझ्या प्रियकराला तुम्ही मारलं, पण त्याचं प्रेम जिंकलं… तुम्ही हरलात,” असे तिने कुटुंबीयांना सुनावत हंबरडा फोडला. सक्षम नसला तरी त्याच्यासोबतची नाळ आयुष्यभर जपण्याचा निर्धार तिने व्यक्त केला.
घटनेनंतर जिल्ह्यात आणि राज्यभर संतापाची लाट उसळली असून आरोपींना कठोर शिक्षा, अगदी मृत्युदंडाची मागणीही जोर धरत आहे. ‘सैराट’सदृश मानसिकतेमुळे पुन्हा एक जीव गेला, यावरून समाजात गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


