मलकापूर (प्रतिनिधी) – तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तेलंगणा येथील दाम्पत्याचा शेवटी हृदयद्रावक शेवट झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील वडनेर भोलजी उड्डाणपुलाजवळील दाट झुडपांत लपलेल्या एका विहिरीत त्यांच्या कारचा शोध लागला आणि त्याच कारमधून पती–पत्नीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली.

सीतापूरम (तेलंगणा) येथील सिमेंट उद्योगात कार्यरत असलेले पद्मसिंह दामू पाटील (४९) आणि पत्नी नम्रता (४५) हे २७ नोव्हेंबर रोजी आपल्या चारचाकीतून (क्रमांक एमएच १३ बीएन ८४८३) डोकलखेडा येथील विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत नातलगांशी त्यांचा संपर्क होता. मात्र त्यानंतर दोघांचेही फोन बंद लागल्याने कुटुंबीयांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आणि तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.
टोलनाका रेकॉर्ड आणि शेवटचे लोकेशन आशंकांना चालना
पोलिस तपासात दाम्पत्याने संध्याकाळी ६.३१ वाजता बाळापूर टोलनाका पार केल्याची नोंद मिळाली. मोबाईलचे शेवटचे लोकेशन वडनेर भोलजी परिसरात थांबल्यानंतर २८ नोव्हेंबरपर्यंत कोणताही ठोस पुरावा मिळाला नव्हता. त्यामुळे महामार्गालगतच्या विहिरी, नाले, झुडपे आणि संवेदनशील भागात शोध वाढवण्यात आला.
पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गजानन कौळासे व पथकाने परिसरात मोठी झाडाझडती घेतली. चार विहिरी तपासल्यानंतर पाचव्या विहिरीत संशयास्पद कार दिसून आली आणि प्रकरणाचा उलगडा झाला.
रेस्क्यू पथकाची धावाधाव – क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर
जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी शनिवारी सकाळीच नांदुरा पोलिस ठाण्यात तपासाचा आढावा घेतला होता. दुपारी कार आढळल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ओम साई फाउंडेशन रेस्क्यू टीम, नांदुरा फायर ब्रिगेड आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांतून क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली. सायंकाळपर्यंत दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
अपघात की घातपात? नातेवाईकांची शंका
मृतांच्या नातेवाईकांनी हा साधा अपघात नसून संशयास्पद मृत्यू असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणालाही जबाबदार धरत संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
घटनेमागील नेमके कारण उलगडण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू असून अधिकृत निष्कर्षाची प्रतीक्षा आहे.



