नगरपालिका निवडणुकीत पुर्नमतदानाला ‘चाप’; तीन सेकंदांत वाळणाऱ्या शाईचे मार्कर पेन उपलब्ध :

भूसावळ (प्रतिनिधी ) : आगामी नगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेला अधिक काटेकोर बनवण्यासाठी निवडणूक आयोगाने म्हैसूर येथील सरकारी कंपनीकडून विशेष प्रकारची मार्कर पेन मागवली आहेत. एकूण ४८० मार्कर पेन भूसावळ येथे दाखल झाले असून, या पेनमधील शाई फक्त तीन सेकंदात वाळते, अशी माहिती मतदार नोंदणी विभागातून देण्यात आली.

मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराच्या बोटावर ही शाई लावली जाणार असून ती अतिशय लवकर वाळत असल्यामुळे दुबार मतदानाचा प्रयत्न करणाऱ्यांना चाप बसेल, असा विश्वास निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

म्हैसूरहून आलेली ही शाई विशेष रासायनिक मिश्रणावर आधारित असून अधिक टिकाऊ व ओळखता येण्यास सहज आहे. आगामी निवडणूक पारदर्शक व निष्पक्ष रितीने पार पडावी, यासाठी ही नवीन पद्धत अधिक परिणामकारक ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निवडणूक आयोगाकडून मिळालेली ही अत्याधुनिक मार्कर पेन मतदान केंद्रांवर लवकरच वितरित करण्यात येणार आहेत.