भुसावळ (प्रतिनिधी) –भुसावळ नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीत सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. शहरातील एकूण 40 मतदान केंद्रांना संवेदनशील व अतिसंवेदनशील श्रेणी देण्यात आली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून सतत नजर ठेवली जाणार आहे. निवडणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस विभागाने संबंधित भागांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त व गस्त वाढवली आहे.

यावल रोडवरील द.शि. विद्यालय परिसर – अनेक कक्ष संवेदनशील
यावल रोडवरील द.शि. विद्यालयाच्या पूर्वेकडील उत्तर-दक्षिण इमारतीतील विविध मतदान कक्षांमध्ये संभाव्य गर्दी, वाढलेली मतदार संख्या आणि भूतकाळातील किरकोळ तणाव लक्षात घेता त्यांना संवेदनशील घोषित करण्यात आले आहे.
जूना सतारा – पालिका शाळा क्र. 2 मधील दोन केंद्रे अतिसंवेदनशील
जूना सतारा परिसरातील पालिका शाळा क्रमांक 2 मधील दोन मतदान केंद्रांना अतिसंवेदनशील श्रेणी देण्यात आली आहे. या भागात पूर्वी कायदा-सुव्यवस्थेची आव्हाने निर्माण झाल्याने येथे विशेष पोलिस बंदोबस्त, पायदळ गस्त, सीसीटीव्ही नियंत्रण आणि तात्काळ प्रतिसाद पथके तैनात करण्यात येणार आहेत. हा परिसर शहर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात आहे.
खळवाडी – भालचंद्र धोंडू पाटील विद्यालयातील केंद्रेही संवेदनशील
खळवाडीतील भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यालयातील अनेक मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून नोंदली गेली आहेत. येथे गर्दीची शक्यता, मर्यादित प्रवेशद्वारे आणि वाहतूक अडथळे लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे.
रेल्वे परिसर – अरुंद रस्त्यांसह वाढत्या गर्दीसाठी विशेष योजना
रेल्वे हॉस्पिटलजवळील महिला सेवा समाज समिती संस्कृती इंग्लिश प्रायमरी स्कूल, रेल्वे नॉर्थ कॉलनी विद्यामंदिर, तसेच संत गाडगे महाराज हिंदी विद्यालय येथील काही मतदान केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा तैनात राहणार आहे. रेल्वे परिसरातील अरुंद रस्ते व निवडणूक दिवशी अपेक्षित गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र योजना तयार केली आहे.
जळगाव रोड व खडका रोड – अनेक केंद्रांवर कडक नियंत्रण
जळगाव रोडवरील पालिका शाळा क्रमांक 29 आणि दादासाहेब रामदास गणपत झांबरे माध्यमिक विद्यालय (भुसावळ हायस्कूल) येथील अनेक मतदान केंद्रांना संवेदनशील यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र कर्मचारी काम पाहतील.
खडका रोडवरील एम.आय. तेली इंग्लिश मिडीयम स्कूल व दीनदयाल नगरातील पालिका शाळा क्रमांक 35 येथे संयुक्त पथकांकडून गस्त वाढवली जाणार आहे.
मतदारांना शांततेचे आवाहन
मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनधिकृत प्रचार किंवा तणावजन्य कृतींपासून दूर राहावे, तसेच संवेदनशील भागात काहीही अयोग्य प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे.


