भुसावळात चिमुकली यज्ञाला भावपूर्ण श्रद्धांजली ; आरोपीला कठोर शिक्षेची सर्वांची मागणी:

भुसावळ (प्रतिनिधी ) – मालेगावमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेत बळी ठरलेल्या तीन वर्षांच्या निरागस चिमुकली यज्ञा हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिवशक्ती हुडको कॉलनी परिसरातील प्रभाग 23(ब) मध्ये ॲड. जास्वंदी भंडारी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला व मुली शांततेत पणत्या हातात घेऊन गजानन मंडळ येथून रानातला महादेव मंदिरापर्यंत पायी शांतता मोर्चा काढला.

मंदिरात पणत्या ठेवून यज्ञा हिला शांती मिळो व तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी उपस्थितांनी प्रार्थना केली. या वेळी महिलांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी किंवा त्याला जनतेच्या ताब्यात द्यावे, अशी संतापपूर्ण मागणी केली.

कॉलनीतील रहिवासी सुमनताई बोरसे यांनी महिलांना आपल्या मुलींची अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले. ॲड. जास्वंदी भंडारी यांनी “कोणावरही सहज विश्वास ठेवू नका व लहान मुलींना कोणाच्याही स्वाधीन करू नका” असा इशारा दिला.

सौ. स्वाती श्रीगोंदेकर यांनी महिलांनी व मुलींनी कराटे, लाठीकाठी यांसारखे स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची गरज व्यक्त केली.
उपस्थित सर्व माता-भगिनींनी एकमुखाने “अशा नराधमांना रोखण्यासाठी कडक कायदा अस्तित्वात यावा” अशी मागणी शासनापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता व्यक्त केली.

या शोकसभेत हुडको परिसरातील महिला व मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.