सेवानिवृत्ताच्या मुलाला रेल्वेत नोकरीच्या आमिषाने 13 लाखांचा गंडा –

जळगाव (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त कर्मचार्‍याच्या मुलाला रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे गोड आमिष दाखवून एका 67 वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाकडून तब्बल 12 लाख 50 हजार रुपये उकळण्यात आले. गुरुवारी जिल्हापेठ पोलिसात चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला.


फिर्यादी संतोष माणिक चौधरी (67, रा. निमखेडी शिवार) यांनी तक्रारीत म्हटले आहे की, 21 फेब्रुवारी 2021 ते 31 ऑक्टोबर 2025 या चार वर्षांच्या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली. शहरातील नवीन बसस्थानकाजवळील चिमुकले राम मंदिर परिसरात आरोपींनी चौधरी यांच्याशी ओळख वाढवून विश्वास संपादन केला.

संदीप वसंत भोळे, दीपाली संदीप भोळे (दोघे रा. जिल्हापेठ, जळगाव), तसेच त्यांच्या साथीदार धीरज पांडुरंग मुंगलमारे (भंडारा) आणि अण्णा नामदेवराव गोहत्रे (नागपूर) या चौघांनी फिर्यादी यांचा मुलगा जगदीश चौधरी याला रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांनी रोख आणि ऑनलाइन व्यवहारातून तब्बल 15 लाख रुपये स्वीकारले.

पैसे घेतल्यानंतर आरोपींनी जगदीश चौधरी यांना रेल्वेत नोकरी लागल्याचा बनावट नियुक्ती आदेशही दिला मात्र प्रत्यक्षात नोकरी न लावता आणि घेतलेले पैसे परत न करता आरोपींनी केवळ दोन लाख 50 हजार रुपये परत केले तर उर्वरित 12 लाख 50 हजार रुपये हडप केले. फसवणूक उघडकीस येताच संतोष चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला.