जमिनीच्या वादातून मामा-मामीला कारखाली चिरडले -निफाड तालुक्यातील घटना ;

निफाड (३/११/२०२५) : जमिनीच्या वादातून मामा -मामीला भाच्याने कारखाली चिरडल्याची घटना निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील गोदावरीच्या पुलावर घडली. मृत सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील रहिवासी आहेत. किसन एकनाथ दराडे (38), बेबी किसन दराडे (33) असे ठार मामा- मामीचे नाव असून भाऊसाहेब सखाहरी साबळे (डोंगरगाव, ता.निफाड) असे अटकेतील आरोपी भाच्याचे नाव आहे.

असे आहे खून प्रकरण
खंबाळे येथे आजोबा एकनाथ दराडे यांच्या नावावर असलेल्या शेत जमिनीमध्ये त्यांच्या मृत्यू पश्चात आईला हिस्सा द्यावा या मागणीसाठी भाऊसाहेब साबळे हा किसन दराडे यांना तगादा करत होता. मात्र वारस नोंदी केल्या नाहीत त्यामुळे हिस्सेवाटप कसे करणार असे दराडे सांगत जात होते. शनिवारी भाऊसाहेब याने आपली आई गंभीर असल्याचे सांगत मामा व मामीला डोंगरगावला भेटायला बोलावून घेतले. त्याच्या इतर मावशांनाही त्याने फोन करून असेच सांगितले होते. किसन पत्नीला सोबत घेऊन गेले मात्र तेथे पोहोचल्यावर भाचा भाऊसाहेब याने जमिनीच्या हिश्शावरून भांडण केले.

सायंकाळी दोघे पती-पत्नी त्यांची मोटारसायकलवरून खंबाळे येथे यायला निघाले असता भाऊसाहेब याने त्याच्या इको कारमधून पाठलाग केला. खेडलेझुंगे येथून सोमठाणेच्या दिशेला येण्यासाठी ते गोदावरीच्या पुलावर आले असता पाठीमागून आलेल्या इको कारने दुचाकीला जोराची धडक देऊन अपघाताचा बनाव केला. या घटनेत दुचाकीवरील दोघांचाही गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला होता. दराडे यांच्या नातेवाईकांना याबाबत समजल्यावर त्यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी संशयित भाऊसाहेब याला ताब्यात घेतले. सायखेडा पोलिसांनी मयताचे भाऊ अ‍ॅड.विश्वनाथ दराडे यांच्या फिर्यादीवरून भाऊसाहेब विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याला कोर्टाने 4 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.