ADGP च्या गाडीसमोरच भुसावळ शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी सावकारे बंधूंचे बाजारपेठ पोलीस ठाण्याबाहेर धाडसी आंदोलन

ADGP च्या गाडीसमोरच भुसावळ शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी सावकारे बंधूंचे बाजारपेठ पोलीस ठाण्याबाहेर धाडसी आंदोलन
भुसावळ (प्रतिनिधी ) -३०/१०/२५, राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक नवल बजाज हे आज बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कामकाजाच्या तपासणी संदर्भात भुसावळ आले होते. जळगाव जिल्ह्यातील पोलीस स्थानकांमधून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनची याकामी निवड करण्यात आली होती. मी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कामकाजा संदर्भात समाधानी आहे, हे एडीजीपी बजाज यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की वाढती गुन्हेगारी आहेच, मात्र लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणात कर्मचारी संख्या वाढलेली नाही. कर्मचारी संख्या वाढण्यासाठी व नवीन भरती होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.
अवैध धंदे बंद होण्यासाठी सावकारे बंधूंचे आंदोलन
दरम्यान भुसावळ शहरातील सर्वच भागात सट्टा मटका आणि इतर जुगाराचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळलेले असून यातून गरीब कामगार आणि मजूर वर्गाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप ॲड हर्षल सावकारे आणि मयुर सावकारे यांनी केला आहे. विशेष म्हणजे बाजारपेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये तर बिनबोभाटपणे बाजारपेठ पोलिसांच्या आशीर्वादानेच सट्टा मटका जुगार सुरू असून, यातून पोलिसांना दरमहा लाखो रूपयांची वरकमाई होत आहे.
छत्रपती शिवरायांचा अवमान
बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चालणाऱ्या या संकुलातील काही गाळ्यांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे छत्रपती शिवरायांचा अवमान होत असतानाही बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जाणिवपूर्वक त्या अवैध धंद्यांवर कारवाई करत नसल्याचा आरोप सावकारे बंधूंनी केला आहे. अप्पर पोलीस महासंचालक यांच्या गाडी समोरच अवैध धंद्यांविरोधात झालेल्या या अनोख्या निषेध आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा आता आणखी डागाळलेली असून, सावकारे बंधूंच्या अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिस महासंचालक यांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे नगरपरिषद प्रशासन सुद्धा याठिकाणी गाळ्यांच्या करारनाम्याचा भंग होत असतानाही सदरील गाळ्यांवर कोणतीच उचित कारवाई करत नसल्याने, पोलिस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाच्या संगनमताने हे अवैध धंदे सुरू आहेत का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे आता या अवैध धंद्यांवर आणि संबंधित पोलिसांवर काय कारवाई होते ? याकडे सुज्ञ भुसावळकर नागरिकांचे लक्ष केंद्रित झालेले आहे.
सट्टा मटका दुकानदार फरार
दरम्यान अप्पर पोलिस महासंचालक यांच्या गाडी समोर आंदोलन केल्यानंतर सावकारे बंधूंनी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील सट्टया मटक्याच्या दुकानांसमोर पुन्हा एकदा जोरदार आंदोलन केले, त्यामुळे दुकानांमध्ये सट्टा खेळणारे आणि लिहिणारे आणि जुगारी यांनी लागलीच पळ काढला. तसेच दुकाने बंद करून लागलीच फरार झाले होते.