चारित्र्याच्या संशयाने त्रस्त पत्नीने पतीचा गळा आवळून केला खून:

दिवाळीच्या शुभेच्छांची पोस्ट ठरली अखेरची; पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ

पिंपरी (प्रतिनिधी) — चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून त्रस्त झालेल्या पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथील माणिक कॉलनी, लिंक रोड परिसरात शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेत नकुल आनंद भोईर (वय ४०, रा. भोईर कॉलनी, चिंचवड) यांचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी त्यांच्या पत्नीला चैताली नकुल भोईर (वय २८) हिला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दाम्पत्यामध्ये सतत वाद सुरू होता. पती नकुल भोईर हे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होते. शुक्रवारी पहाटे साडेअडीचच्या सुमारास झालेल्या वादात संतापाच्या भरात चैताली हिने कापडाने पतीचा गळा आवळून खून केला, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

निवडणुकीची पार्श्वभूमी
मयत नकुल भोईर हे सामाजिक कार्यकर्ते, सर्पमित्र तसेच मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत पत्नी चैताली यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते. नकुल यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर टाकलेली दिवाळी शुभेच्छांची पोस्टच त्यांची अखेरची ठरली आहे.

या हत्येमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली असून, चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.