आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला तंबाखूच्या व्यसनापासून दूर करण्याचा संकल्प करत जनजागृती करा – प्राचार्य. डॉ. आर. बी. वाघुळदे ; धनाजी नाना महाविद्यालयात तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0 आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी;

  फैजपूर (प्रतिनिधी ) -  येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या वतीने आज दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0 आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी भूषविले, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेचे नाशिक विभागीय संघटक प्रमुख आणि दादासाहेब देविदास नामदेव भोळे  महाविद्यालय, भुसावळ येथील माजी भौतिक शास्त्र विभाग प्रमुख असलेले प्रा. डॉ. दयाघन राणे हे प्रमुख व्याख्याते म्हणून तर प्रा डॉ सतीश पाटील हे कार्यक्रम प्रमुख म्हणून उपस्थित होते. 
       आपल्या मार्गदर्शन सत्रात प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी तंबाखू सेवनामुळे समाजात वाढत चाललेल्या कॅन्सरच्या प्रादुर्भावाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आज तंबाखूमुळे युवा वर्गासह ज्येष्ठ नागरिकही गंभीर आजारांना बळी पडत आहेत. या संकटापासून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून च बदल घडवावा, तसेच कोणत्याही व्यसनापासून स्वतःला वाचवायचे असेल तर 'ठामपणे नाही म्हणायला'  शिकले पाहिजे. त्या बरोबरच मनाचा पक्का निर्धार ठेवत स्वतःला व्यसनमुक्त ठेवावे असे आवाहन त्यांनी एन. एस. एस. स्वयंसेवकांना करीत आपल्याच परिसरातील तंबाखूचे दुष्परिणाम भोगलेल्या व्यक्तींची ओळख गुप्त ठेवत उदाहरणे दिली.
  अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी एन. एस. एस. स्वयंसेवकांना तंबाखूमुक्त समाज निर्मितीसाठी जनजागृती मोहीम राबवण्याचे आवाहन केले. “आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला तंबाखूच्या व्यसनापासून दूर करण्याचा संकल्प करत जनजागृती करा,” असे ते म्हणाले.
 कार्यक्रम संपन्न झाल्यावर विद्यार्थ्यांशी अनौपचारिक चर्चा करीत असताना विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधी जनजागृती बरोबरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरणाने विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना जागृत झाली असे मत व्यक्त केले. 
  कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. दयाघन राणे यांचे स्वागत प्राचार्य डॉ आर बी वाघुळदे यांनी, प्राचार्य डॉ वाघुळदे यांचे स्वागत कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ सतीश पाटील यांनी केले. या वेळी एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सतीश दत्तात्रय पाटील, सहायक कार्यक्रमाधिकारी प्रा. विकास वाघुळदे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सविता कलवले तसेच एन. एस. एस. चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अश्विनी पवार यांनी केले.  आभार प्रदर्शन कु. श्वेता भालेराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कीर्ती महाजन, श्वेता भालेराव, अश्विनी पवार, प्रेरणा भालेराव, दीक्षा वानखेडे तसेच एन. एस. एस. च्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.