अंतरराष्ट्रीय मानसिक आरोग्य दिना निमित्ताने “मानसिक प्रथमोपचार” विषयावर सलग पाचव्या वर्षी वेबिनार संपन्न!

भुसावळ (प्रतिनिधी ) – सक्षम कौन्सेलिंग आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने “मानसिक प्रथमोपचार” या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि प्रत्येक व्यक्तीने इतरांच्या भावनिक स्थितीबद्दल संवेदनशीलतेने प्रतिसाद द्यावा हा या वेबिनारचा मुख्य उद्देश होता. महाराष्ट्रातील विविध भागांतून भुसावळ व्यतिरिक्त पुणे, मुंबई अमरावती, सोलापूर येथुन तब्बल 47 जागरूक लोक सहभागी उपयुक्त वेबिनारला उपस्थित राहिले.
वेबिनारच्या मुख्य वक्त्या सामुपदेशक सौ. आरती चौधरी यांनी ‘मानसिक प्रथमोपचार’ म्हणजेच संकटात असलेल्या व्यक्तीला दिला जाणारा भावनिक आधार या विषयावर अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. “मनाला पहिली मदत” म्हणून ओळखला जाणारा हा विषय प्रत्येकाने समजून घेणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी प्रभावी उदाहरणांसह स्पष्ट केले.
प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुवर्णा गाडेकर यांनी मानसिक व शारीरिक आरोग्याचा परस्पर संबंध मांडताना महिलांमधील भावनिक ताण आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी सखोल माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटेरियन संजय चापोरकर यांनी केले. त्यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याच्या उपक्रमांचा उल्लेख करत मानसिक आरोग्यविषयक जनजागृतीची गरज अधोरेखित केली. सूत्रसंचालन क्षमा फेगडे यांनी प्रभावीपणे केले.
डॉ. उर्मी ठक्कर पुणे यांनी झूम प्लॅटफॉर्म विनामूल्य उपलब्ध करून दिला.
वेबिनारनंतर सहभागींच्या प्रतिक्रिया उत्साहवर्धक होत्या. सर्वांनी या विषयावर नियमितपणे असे उपक्रम व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.