भुसावळ, (प्रतिनिधी ) -ता. २५ : येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी तर्फे आयोजित रो. कै. प्रसन्न देव स्मृती गणेशोत्सव पुरस्कार स्पर्धेत जय गणेश फाउंडेशनने प्रथम क्रमांक पटकावला. राज्याचे वस्त्रोद्योग संजय सावकारे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी रेल सिटीचे अध्यक्ष देवेंद्र वाणी, सचिव हरमितसिंग माखन, प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.
रोटरी रेल सिटी तर्फे दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकांमध्ये सामाजिक संदेश देणाऱ्या मंडळांना व घरगुती गणपतीची पर्यावरण पुरक कल्पक आरास करणाऱ्यांना सन्मानित करण्यात येते. यंदा प्रथमच गुरु शिष्यांचा एकत्रित तबला वादन व कलेचे महत्व विशद करणारा कार्यक्रम, सामाजिक संदेश देणारी नाटिका आदी उपक्रम राबविल्या बद्दल जय गणेश फाउंडेशनला प्रथम क्रमांक तर कागदाच्या लगद्यापासून गणपतीची मुर्तीची स्थापना केल्या बद्दल अलंकार मंडळाला व्दितीय क्रमांक तर अग्निशमन पथक आदी दुर्लक्षित घटकांना आरतीचा सन्मान दिल्या बद्दल श्री शारदा मंडळाला तृतीय क्रमांक देण्यात आला. घरगुती पर्यावरण पुरक सजावटीचे पुरस्कार पुढीलप्रमाणे. (खुला गट): प्रथम क्रमांक- पंकज नेवे, द्वितीय-सुषमा भारंबे, तृतीय- हर्ष वाणी तसेच (सिटी सदस्य गट)
प्रथम क्रमांक- चेतन पाटील, द्वितीय- मनोज सोनार, तृतीय- अनिकेत पाटील यांना मिळाला. राजेंद्र जावळे व जीवन महाजन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री सावकारे म्हणाले गणेशोत्सव अथवा कोणताही उत्सव साजरा करताना आपण समाजाला काय देतो ? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. मोठ्या मुर्तीचा अट्टाहास सोडायला हवा. बऱ्याच वेळा विसर्जन प्रसंगी या मुर्तीची अवहेलना होते. उत्सव साजरा करण्या मागचा लोकमान्य टिळकांचा उद्देश समाजात एकोपा निर्माण व्हावा हा होता. नव्या पिढीने याचे भान ठेवणे आवश्यक आहे. कोणाला त्रास होईल अश्या पध्दतीने उत्सव साजरे होता कामा नये असे सावकारे म्हणाले. मिलिंद धर्माधिकारी यांनी सुत्रसंचलन केले. स्पर्धेचे को-चेअरमन दिनेश पाटील व रेलसिटी सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

फोटो ओळी-भुसावळ : रोटरी रेल सिटीच्या कै. प्रसन्न देव स्मृती गणेशोत्सव पुरस्कार स्पर्धेतील विजेत्यांन सोबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, देवेंद्र वाणी, हरमितसिंग माखन, श्रीकांत जोशी आदी.


