अस्तित्वातच नसलेल्या उपक्रमात सहभागी असण्याचे मागितले प्रमाणपत्र : शालेय शिक्षण विभागाचा अजब कारभार : प्र ह दलाल यांचा आरोप ;


भुसावळ (प्रतिनिधी ) – अस्तित्वातच नसलेल्या उपक्रमात सहभागी असण्याचे मागितले प्रमाणपत्र , शालेय शिक्षण विभागाचा अजब कारभार!
राज्यशिक्षक पुरस्काराचे सुधारित निकष व अटी बाबतचे 16 जुलै 25 च्या परिपत्रकात काही चमत्कारिक बाबी असल्याचा आरोप . प्र. ह.दलाल.यांनी केला आहे .
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार बाबत महाराष्ट्र शासन,शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 16 जुलै 25 रोजी एक परिपत्रक काढले आहे.त्यात राज्य पुरस्कार साठी प्रस्ताव पाठविण्या साठी नवीन अटी व निकष दिलेले आहेत. त्यात क्र.8 मध्ये शिक्षक निर्व्यसनी असल्याबाबत “शाळा व्यवस्थापन समिती” चे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.शिक्षक निर्व्यसनीच असावा याबाबत वादच नाही.व्यसनी शिक्षक म्हणजे पवित्र शिक्षकी पेशाला कलंकच आहे.तथापि ही अट घालताना ” व्यसनी”,निर्व्यसनी” ह्या शब्दाची नेमकी व्याख्याही स्पष्ट करणे आवश्यक होते. प्रमाणपत्र देणाऱ्या शाळा समिती सदस्यांना मात्र ह्यानिमित्त शिक्षकांकडून त्यासाठी पैसे मागण्याची आणखी एक संधी मिळेल अर्थात काही सन्माननीय अपवाद सोडून..त्यापेक्षा शिक्षकाने स्वतःच्या स्वाक्षरिणीशी निर्व्यसनी असल्याचे एफिडेविट करून देणे व खोटे निघाल्यास त्यांचेवर गुन्हा दाखल होईल अशी तरतूद करता आली असती. अनेक संस्थाचालक काही सन्माननीय अपवाद सोडून स्वतःच व्यसनी असण्याची शक्यता नाकारता येत नाही मग अशांनी शिक्षकांना निर्व्यसनी प्रमाणपत्र देणे हा एक विनोदच म्हणावा लागेल! महत्वाचे म्हणजे माध्यमिक शाळांमध्ये तरी अशी कोणतीही ” शाळा व्यवस्थापन समिती” च् अस्तित्वात नाही .मग हे प्रमाणपत्र आणायचे कोठून व कसे?
निकष क्र.15…आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था तयार करण्याबाबत शासन निर्णय 16/4/ 25 नुसार तालुका/ जिल्हा/ राज्य स्तरावर निवड झाली असेल तर अनुक्रमे 5/10/15 गुण देण्यात येईल असे म्हटले आहे.परंतु अशी कोणतीही निवड प्रक्रिया आजपर्यंत तरी शासन स्तरावरून सुरू झालेलीच नाही.मग जे अस्तित्वातच नाही त्याचे प्रमाणपत्र आणायचे तरी कसे व कोठून?
क्र.9( ब ) ..वर्षभर शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मुले शाळेत येतात. ह्या वाक्याचा अर्थ काय घ्यावा? ही कोणती अभिजा मराठी! क्र.14….” उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम.असे वाक्य आहे.ह्या नावाचाही कोणता कार्यक्रम / योजना मुळात अस्तित्वातच नाही.कदाचित तो शब्द ” उल्हास असा असेल .

शिक्षण विभागाच्या परिपत्रकात तरी अर्थहीन वाक्यरचना व अशुध्द शब्द अपेक्षित नाही मात्र ह्या परिपत्रकात उल्हास, तज्ज्ञ ह्याप्रमाणे अचूक लिहिलेले नाहीत.
क्र.5..प्रथितयश प्रकाशकाने प्रकाशित केलेले ५ प्रत्येक ग्रंथास ग्रंथ. ह्या वाक्याचा अर्थ कोणी तरी सांगा हो!
शासनाने ३ फेब्रुवारी २५ रोजी मराठीचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून काढलेल्या पत्रकात स्पष्ट म्हटले आहे की सर्व शासकीय,निमशासकीय कार्यातील सर्व कामकाज 100 टक्के मराठीतच करणे आवश्यक व अनिवार्य आहे परंतु शासनाच्या आदेशाला झिडकारून दशिक्षण विभागाने मात्र सदर परिपत्रकात ” आयडॉल, इन्स्पॉयर्ड अवॉर्ड असे इंग्रजी शब्द वापरले आहे त्यांना मराठी भाषेत प्रतिशब्द नव्हते का? शासनाचे आदेश शासन विभागच पाळणार नसेल तर इतरांकडून तरी का अपेक्षा करावी? असा उद्विग्न प्रश्न प्र. ह.दलाल यांनी विचारला आहे.