मुंबई – . मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), पनवेल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) बंगळुरू आणि गुन्हे गुप्तचर शाखा (सीआयबी) कुर्ला, मुंबई यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एका परदेशी नागरिकाला ट्रेन क्रमांक 12618 हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम मंगला एक्सप्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली.

ट्रेन क्र. 12618 मंगला एक्सप्रेसमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो बंगळुरू यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, श्रीमती अंजनी बाबर, निरिक्षक,आरपीएफ पनवेल, प्रल्हाद सिंह, सहाय्यक उपनिरीक्षक/रेल्वे सुरक्षा बल पनवेल, मुरारी लाल आणि मधुसूदन विश्वकर्मा, गुप्तचर अधिकारी, एनसीबी बंगळुरू, श्री सतीश कुमार यादव, निरिक्षक/गुप्तचर शाखा पनवेल, श्री नवीन सिंह, उपनिरीक्षक/गुप्तचर शाखा कुर्ला व प्रल्हाद पाटील,हज्योती कुशवाह, ज्ञश्री धिरेन्द्र यादव यांच्यासह एक संयुक्त पथक तयार करण्यात आले.
पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर ट्रेन येताच पथकाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली. शोध दरम्यान, कोच ए-२ मधील सीट क्रमांक २७ वर एका अर्भकासोबत आणि बहुरंगी ट्रॅव्हल बॅग घेऊन जाणारी एक नायजेरियन महिला आढळली. तिने स्वतःची ओळख एतुमुदोन डोरिस अशी करून नायजेरियन पासपोर्ट क्रमांक ए०६८९५९९१ असलेला दाखवून दावा केला की तिच्यासोबत असलेले मूल, ज्याचे नाव “मिरॅकल” आहे, ते तिचे स्वतःचे आहे. साक्षीदारांच्या उपस्थितीत चौकशी केल्यानंतर, महिलेने अंमली पदार्थ बाळगल्याची कबुली दिली. तिला आरपीएफ पोस्ट पनवेल येथे आणण्यात आले आणि तिच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. बहुरंगी ट्रॅव्हल बॅगमध्ये अधिकाऱ्यांना “व्हिंटेज” असे लेबल असलेले रबर मटेरियलमध्ये गुंडाळलेले दोन आयताकृती काळे पॅकेजेस आढळले. ड्रग डिटेक्शन किट वापरून तपासणी केल्यावर, त्यात कोकेन असल्याचे आढळून आले. एकूण २.००२ किलो कोकेन जप्त करण्यात आले.
पुढील तपासणीत मुख्य कॅरी बॅगमध्ये लाल आणि निळ्या रंगाची मिकी माऊस-थीम असलेली मुलांची बॅग आढळली. या लहान बॅगमध्ये दोन कागदी पॅकेजेस होती – एक “केलॉग्स कॉर्न फ्लेक्स” असे लेबल असलेले आणि दुसरे “बोंगची परफेक्ट रोल”. या पॅकेटमध्ये १.४८८ किलो वजनाचे मेथॅम्फेटामाइन म्हणून ओळखले जाणारे पांढरे स्फटिकासारखे पदार्थ आढळले.
जप्त केलेले अंमली पदार्थ, ज्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे रु३६ कोटी आहे, श्री मुरारी लाल, ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर, एनसीबी बंगळुरू यांनी ताब्यात घेतले. नायजेरियन महिलेला २१/२०२५/बीझेडयू प्रकरणात आरोपी क्रमांक ३ म्हणून नाव देण्यात आले आहे आणि तपास अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.


