चाळीसगावमध्ये अमली पदार्थांची वाहतूक उघडकीस, १४.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त, चारजण अटकेत –


चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव शहर पोलिसांनी रात्रीच्या वेळी तपासणीदरम्यान एका वाहनातून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. कारवाईत एकूण १४ लाख ५७ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जळगाव नियंत्रण कक्षाच्या सूचनेनुसार १७ जुलै रोजी रात्री १ ते ३ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी रात्री २.५० वाजताच्या सुमारास भडगावहून नांदगावकडे जाणारी पांढऱ्या रंगाची फोर्स कंपनीची टॅक्स क्रूझर गाडी (MH-18 BX-8943) थांबवण्यात आली.

तपासणीदरम्यान वाहनाच्या सीटखाली प्लास्टिकच्या बॅगांमध्ये ३२ किलो ५० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या अंमली पदार्थाचे अंदाजे बाजारमूल्य २,५७,४१६ रुपये असल्याचे सांगितले जाते. संबंधित वाहनाची किंमत १२ लाख रुपये असून, एकूण मुद्देमालाची रक्कम १४,५७,४१६ रुपये इतकी आहे.

पोलिसांनी याप्रकरणी राहुल पहाळया पावरा (२३ वर्षे), अक्तारसिंग शिवदास पावरा (२४ वर्षे), रविंद्र पंडीत पायरा (२० वर्षे), पहाडसिंग कुमार पावरा (२४ वर्षे) (सर्वजण रा. महादेव दोडंवाड, ता. शिरपूर, जि. धुळे) या चार संशयितांना अटक केली आहे. त्यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक ना. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर व उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभीठकुमार मनेळ यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईसाठी सपोनि भरत चौधरी व गुन्हे शोध पथकाने संयुक्त प्रयत्न केले.