फेसबुक लाईव्हद्वारे मंत्री संजय सावकारे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा : डाेंंबिवलीच्या भूषण पाटीलविरोधात अ‍ॅट्रासिटीसह तीन गुन्हे

भुसावळ ( प्रतिनिधी) : घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह भुसावळचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याविषयी शनिवार, 5 जुलै रोजी फेसबुक लाईव्ह करून साकेगावातील रहिवासी व डोंबिवलीस्थित भुषण पाटील नामक मनोविकृताने गरळ ओकून अवमान जनक भाषा वापरल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी वरणगावसह भुसावळ बाजारपेठ पोलिसात तीन गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. संशयीताविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी भाजपा पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

वरणगावात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा
वरणगाव पोलिसात दिलीप सुरवाडे (ओझरखेडा) यांनी तक्रार दिली असून त्यानुसार आरोपी भूषण बी.पाटील विरोधात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत भूषण पाटील नामक व्यक्तीने 5 रोजी फेसबुक लाईव्ह करीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानजनक शब्दांचा प्रयोग केला शिवाय मंत्री संजय सावकारे यांच्याविषयीदेखील जातीवाचक अपमानजनक अपशब्द वापरून त्यांची बदनामी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलिसात दोन गुन्हे
भुसावळ बाजारपेठ पोलिसात भूषण पाटील विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिली तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांनी दाखल केली आहे. भूषण पाटील या संशयीताने 5 रोजी लहान बंधू व मंत्री संजय वामन सावकारे यांच्या विषयी अपमानजनक शब्दांचा प्रयोग करून त्यांची बदनामी केली तसेच आमचे दैवत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करण्याच्या हेतूने आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला.

दुसरी तक्रार माजी नगरसेवक किरण भागवत कोलते यांनी दाखल केली आहे. आरोपी भूषण पाटील (डोंबिवली) याने आमच्या समाजाबद्दल भावना दुखावणारे वक्तव्य केले तसेच अश्लील शिविगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.