भुसावळात अग्निशमन केंद्रास चार कोटी 30 लाखांचा निधी मंजूर -मंत्री संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश :

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने भुसावळातील अग्निशमन केंद्राची उभारणीसह वाहन खरेदीसाठी तब्बल चार कोटी 30 लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

15 व्या वित्त आयोगांतर्गत अग्निशमन सेवांचा विस्तार व आधुनिकीकरण यासाठी नगरविकास विभागाने या निधीला मंजूरी दिली आहे. या निधीत 75 टक्के हिस्सा केंद्र सरकारकडून तर 25 टक्के हिस्सा राज्य शासनाकडून प्रदान करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

नवीन केंद्राची उभारणी
वाढत्या नागरी विस्तारास आणि वाढत्या आपत्कालीन गरजांसाठी तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी भुसावळ शहरात एक नवीन फायर स्टेशन उभारण्यास दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे केंद्र आधुनिक सुविधा आणि उपकरणांनी सुसज्ज असेल, असे मंत्री संजय सावकारे ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना म्हणाले.

असा मंजूर झाला निधी
भुसावळात अग्निमशन केंद्र बांधकाम तसेच कर्मचारी वसाहतीचे बांधकाम करण्यासाठी दोन कोटी रुपये तसेच अत्याधुनिक वाहन खरेदीसाठी दोन कोटी 30 लाख रुपये असा एकूण 4 कोटी 30 लाख रुपयांचा निधी नगरविकास विभागाने 19 जून रोजी मंजूर केला.

15 व्या वित्त आयोगाच्या शिफारसी नुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सज्जता आणि क्षमता निर्माण निधी वाटपातून हा निधी प्राप्त झाला आहे. अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरण योजनेच्या मार्गदर्शक तत्वे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने दिले होते, यानुसार या निधीचा विनियोग आता होईल.

अग्निशमन सेवा अधिक बळकट होणार : मंत्री संजय सावकारे
नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग असलेल्या भुसावळ नगरपालिकेच्या क्षेत्राचा विस्तार दिवसागणिक वाढत आहे. या अनुषंगाने शहरात अग्निशमन सेवेचे बळकटीकरण करणे काळाची गरज आहे. राज्य शासनाच्या निधीतून नवीन वाहनांची खरेदी तसेच अग्निमशन केंद्र बांधकाम तसेच कर्मचारी वसाहतीचे बांधकाम करण्यात येईल.

भुसावळला आगामी काळात जिल्ह्याचा दर्जा
भुसावळ शहराची जिल्हा निर्मितीकडे वाटचाल सुरू आहे. अतिरीक्त सत्र न्यायालय, सुसज्ज प्रांताधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय तसेच प्रशस्त पोलिस उपअधीक्षक कार्यालयाची उभारणी पाहता आगामी काळात भुसावळ शहराला जिल्ह्याचा दर्जा मिळण्याची आशा आहे.