रावेर : अंकलेश्वर ते बहर्हाणपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राजपत्र प्रसिद्ध केले असून त्यानुसार यात रावेर तालुक्यातील सुमारे 15 नवीन गावांचा समावेश केला आहे. या गावांमधील भूसंपादनासाठी जिल्हाधिकार्यांच्या अधिसूचनेनुसार फैजपूर प्रांताधिकार्यांना आदेश जारी केले आहेत.

नव्या अधिसूचनेत रावेर तालुक्यातील गावांचा समावेश
24 जानेवारी 2022 आणि 7 नोव्हेंबर 2023 च्या अधिसूचनेनुसार कोचूर, विवरा, नांदुरखेडा, अंतुर्लीमार्गे जाणार्या महामार्गात बदल केला होता. त्याला स्थानिकांचा विरोध होता. त्यात रावेर शहरातून किंवा रावेरला जोडून हा महामार्ग जात नसल्याने रावेर परिसरातही नाराजी होती. नव्या अधिसूचनेत हा महामार्ग रावेर तालुक्यातील भातखेडे, रावेर, कोंद, पातोंडी, पुनखेडे, तामसवाडी, खिरवड, वाघोड, मोरगाव खुर्द, मोरगाव बुद्रुक, अटवाडे, अजनाड, खानापूर, चोरवड या गावांचा समावेश आहे.
आठ हजार कोटींचा खर्च
हा महामार्ग गुजरातमधून सात किमी, महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यातून 58, धुळे 48, तर जळगाव जिल्ह्यातून 120 किमी आणि मध्य प्रदेशात 13 किमी असेल. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर तालुक्यातून हा महामार्ग जाईल. महामार्गासाठी भूसंपादनाचे तीन हजार कोटी व रस्ता बांधणीवर 5 हजार कोटी असा एकूण आठ हजार कोर्टीचा खर्च होईल.


