तळवेल शिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह;


( मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके , खुनाची अफवा )


वरणगांव ता भुसावळ । प्रतिनिधी

तळवेल शिवारात रविवारी सकाळी एका शेताच्या गव्हात एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला . तर सदरहु इसमाचा मृत्यु ७ ते ८ दिवसापूर्वी झाला असल्याने मोकाट कुत्र्यांनी मयताच्या शरीराराचा एक हात व एका पायाचे लचके तोडल्याचे आढळून आल्याने सुरुवातीला खुनाची अफवा पसरली होती . तर या घटनेचा पोलीसांनी पंचनामा करून मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला .

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तळवेल – बोहर्डी मार्गावरील पन्नाशी शिवारातील तळवेल ग्रामपंचायत मालकीच्या मक्त्याने केलेल्या गट क्रं . २६५ व २५९ मध्ये जितेंद्र विजय पाटील यांनी गहु लागवड केली आहे . यामुळे आठ दिवसानंतर रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते आपल्या गहु पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना गव्हाच्या पिकात एक ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला . यावेळी मृतदेहाचा एक हात व एक पाय मोकाट कुत्र्यांनी तोडल्याचे निर्दशनास आले . यामुळे त्यांनी पोलीस पाटील दिव्या पाटील व सरपंच विद्या भारसके यांचे पती उल्हास भारसके यांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली व याबाबत वरणगांव पोलीस ठाण्यात खबर दिली . त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोहेकॉ प्रेमचंद सपकाळे , पो.कॉ. मनोज म्हस्के व होमगार्ड राजेंद्र फालक यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला . तर वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ . योगेश अहीरे यांनी घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन केले . यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मृतदेहाचे दफनविधी करण्यात आले .


मयत वेडसर असल्याचा दावा

रविवारी सकाळी शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या युवकाचा मृतदेह पाहुन परिसरातील शेतकऱ्यांनी तो वेडसर असल्याचे सांगितले . सदरहु वेडसर युवक हा आठ ते दहा दिवसापासून याच परिसरात फिरतांना दिसुन आला होता . यामुळे हा मृतदेह त्याच वेडसर तरुणाचा असल्याचा दावा परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे . तर शेतात मृतदेह आढळून आल्याने सुरुवातीला परिसरात खुनाची अफवा पसरली होती . या घटनेचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन खंडेराव , पोहेकॉ . प्रेमचंद सपकाळे व इतर सहकारी पोलीस बांधव तपास करीत आहेत .