वझरखेडा जिल्हा परिषद शाळेच्या आवारात दारूच्या पन्न्या

( शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम, शिक्षक वर्ग त्रस्त )

वरणगाव ता.भुसावळ / प्रतिनिधी

वरणगाव शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वझरखेडा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्री व सुट्टीच्या दिवशी मद्यपिंचा अड्डा बसतो. यामुळे शाळेच्या आवारात गावठी हातभट्टीच्या पन्न्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने पोलिसानी या गावातील अवैधरित्या सुरु असलेल्या दारू विक्रीचा व्यवसाय बंद करण्याची मागणी होत आहे.

वरणगाव पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या वझरखेडा गावात देशी – विदेशी व रासायनिक गावठी हातभट्टी विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच हा व्यवसाय जिल्हा परिषद शाळेलगतच असल्यामुळे गावातील काही मद्यपी गावठी हातभट्टीच्या पन्न्यामधील दारू घेऊन जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच रिचवतात व खाली प्ल्यास्टिकच्या पन्न्या आवारातच फेकून देतात. यामुळे शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात प्ल्यास्टिकच्या पन्नाच्या केर कचरा दिसून येत असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर होत आहे. तसेच शाळेच्या आवारात निर्माण होत असलेल्या या केर कचऱ्यामुळे शिक्षकवर्गही त्रस्त झाला आहे. यामुळे गावात अवैधरित्या विक्री होणारी दारू विक्री बंद करण्याची मागणी होत आहे.इतकेच नव्हेतर शाळा सुटल्यावर किंवा शालेय सुटीच्या दिवशी शाळेच्या ओट्यावर जुगाराचा अड्डा बसवीला जातो. यावेळी जुगारी गुटखा पान मसाला खाऊन शाळेच्या ओट्यावरच पिचकारी मारतात. तसेच दारू पिऊन रिकाम्या बाटल्या व गावठी हातभट्टीच्या पन्न्या सुद्धा त्याच ठिकाणी फेकत असल्याने शाळेच्या आवारात अस्वछता निर्माण होत असल्यामुळे ज्ञानाजर्नाचे धडे देणारे शिक्षकवर्ग तसेच ज्ञान गिरवणारे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत . याप्रकाराने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात असुन पोलिसांनी शाळेच्या आवारात अस्वच्छता निर्माण करणाऱ्या तसेच गावात अवैधरित्या दारू विक्री करणार्‍यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

गावात दारू विक्रीची स्पर्धा
वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या लहानश्या गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सर्रासपणे देशी – विदेशी व गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्यामुळे दारू विक्रेत्त्यांमध्ये स्पर्धा वाढत आहे. यामुळे गावातील अनेक नागरिक व्यसनाधीन होत असून याचा परिणाम त्यांच्या संसारावर होत असल्याने गावातील काही महिलांनी वरणगाव पोलीस ठाण्यात गावातील दारू विक्री बंद करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे. मात्र, पोलिसांकडून केवळ नावालाच कारवाई केली जात असल्याने दारू विक्रेत्त्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे.यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गावातील अवैधरित्या दारू विक्री करण्याऱ्यावंर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

बनावट दारूचा अड्डा केला होता उध्वस्त

पाच महिन्यापूर्वी याभागातील साठवण तलावालगतच्या एका शेतात सुरु असलेला देशी – विदेशी दारूचा बनावट कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उध्वस्त केला होता. तर यावेळी लाखो रुपयाची दारु जप्त करून शेत मालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, या बनावट कारखान्याचे खरे मास्टर माईंड अद्यापही पोलिसांना गवसले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.