भुसावळ (प्रतिनिधी ) –

सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद या ठिकाणी नवोपक्रम ,नवसंशोधन व सहाचर्य यांच्या वतीने ” पेटंट फायलिंग ” या विषयावर एक दिवशीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरचे प्राचार्य डॉ.आर .बी .वाघुळदे म्हणाले, “काळानुरूप बदल होत असतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबतच नवकल्पकतेला, नवसंशोधनाला महत्त्व देणे गरजेचे आहे .आणि अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच नवनवीन संकल्पना विकसित केल्या म्हणजे आपल्याला छोटे छोटे उद्योग धंदे निर्माण करता येतात. रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध करता येतात. आणि आपल्या कुटुंबाला यातून हातभार लागतो. अर्थातच बेरोजगारीची समस्या दूर होण्यास मदत होते. म्हणून नवोपक्रम व नवसंशोधनची कास आपण धरली पाहिजे. याबरोबरच बौद्धिक संपदा अधिकार अर्थातच इंटरॅक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स याविषयी देखील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी सतत जागृत राहणे गरजेचे आहे. व यासंबंधीत माहिती मिळवणे गरजेचे आहे.” सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे हे होते.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्रो.कोल्हे यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. व नवोपक्रम नवसंशोधन यासाठी महाविद्यालय मदतीसाठी नेहमीच तत्पर राहील याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन नवोपक्रम व नवसंशोधन विभागाचे समन्वयक प्रा.डॉ. दिनेश पाटील यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. गणेश चौधरी यांनी व्यक्त केलेत. या कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी याचबरोबर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


