कासोदा – प्रतिबंधीत गांजाची दुचाकीवरून तस्करी होणार असल्याची माहिती कासोदा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सलग चार दिवस सापळा रचला व पाचव्या दिवशी वेषांतर केल्यानंतर आरोपीला पकडण्यात यश आले. आरोपीच्या ताब्यातून दोन लाख 80 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. अजय रवींद्र पवार (27, रा.सोनबर्डी, ता.एरंडोल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत व परीसरात गांजा विक्री होणार असल्याची माहिती कासोदा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सलग चार दिवस वेशांतर केले मात्र संशयीत आलाच नाही मात्र पाचव्या दिवशी संशयीत दुचाकीवरून गांजा नेत असताना त्यास मंगळवार, 25 रोजी वनकोठे गावाजवळ पकडण्यात यश आले. आरोपीच्या दुचाकीवरील गोणी तपासल्यानंतर त्यात खाकी रंगाच्या पॅकेटमध्ये गांजा आढळल्याने तो जप्त करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा सहाय्यक निरीक्षक निलेश राजपुत, पोलीस उपनिरीक्षक दत्तु खुळे, हवालदार नंदलाल परदेशी, नाईक अकील मुजावर, कनाईक किरण गाडीलोहार, नाईक नरेंद्र गजरे, कॉन्स्टेबल समाधान तोंडे, लहु हटकर आदींच्या पथकाने केली. तपास सहा.निरीक्षक निलेश राजपूत करीत आहेत.



