भुसावळ – रेल्वे विभागात ७६ वा प्रजासत्ताक दिन दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांच्या हस्ते भुसावळ येथील रेल्वे क्रीडा मैदानावर ध्वज फडकविण्यात आला. कार्यक्रमासाठी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), आरपीएफ श्वान पथक, नागरी संरक्षण, सेंट जोन्स रुग्णवाहिका, स्काउट्स व गाईड्स यांनी अनुशासनबद्ध पथसंचलनासह सलामी दिली. यानंतर, उपस्थितांना रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा संदेश विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी वाचून दाखवला.
कार्यक्रमामध्ये भुसावळ रेल्वे शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध झलक सादर करून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच, सांस्कृतिक नृत्यांद्वारे देशभक्तीपर भावना जागृत केल्या. यावेळी आरपीएफतर्फे “डॉग शो” आयोजित करण्यात आला.
भुसावळ विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट आणि प्रशंसनीय कार्याबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मंडळ क्रीडा मैदानावर सिंथेटिक रनिंग ट्रॅकच्या(पथज्योत) उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या रेल्वे स्कूल, ताप्ती पब्लिक स्कूल,पोदार इंटरनॅशनल, केंद्रीय विद्यालय येथील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) मुकेश कुमार मीना, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी श्री एन.एस. काझी, तसेच सर्व शाखाधिकारी, कर्मचारी आणि रेल्वे शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही.एस. वडनेरे यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अभियांत्रिकी विभाग, विद्युत विभाग, वैद्यकीय विभाग, तसेच क्रीडा मैदान आणि सर्व कल्याण निरीक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.


