भुसावळ – शहरात गॅस रिफिलिंगच्या अवैध्य व्यवसायांवर पोलिसांचे छापे, मुद्देमाल हस्तगत करत कारवाई केली . शहरात अनेक भागांमध्ये बऱ्याच दिवसांपासून गॅस रिफिलिंगचा अवैध्य व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी दि.17 जानेवारी 2024 रोजी दुपारच्या वेळेस बाजारपेठ पोलीस ठाणे तसेच शहर पोलीस ठाणे हद्दीत एकाच वेळी दोन छापे मारून कारवाई केल्याने गॅस रिफिलिंग करणाऱ्यांमध्ये हडकंप माजला आहे. या कारवाईमध्ये दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 25 गॅस सिलेंडर/टाक्या, दोन रिफिलिंग मशीन, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा तसेच एक रिक्षा वाहन पोलिस कारवाई जप्त करण्यात आले.

सविस्तर माहिती अशी की, शहर बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील पांडुरंग टॉकीज जवळील राहुल नगर भागात गॅस रिफिलिंग व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बागुल, सोपान पाटील, भूषण चौधरी यांना माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे तहसील विभागाचे पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे व पुरवठा अधिकारी रोशन रेवतकर या दोघांना पोलीस स्टेशनला बोलवले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथक व महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले असता एक इसम रिक्षा क्रमांक (एम.एच.19 ए.ई.9944) मध्ये मशीन व्दारे गॅस रिफिलिंग करतांना मिळून आला. सदरील इसमास पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एच.पी.कंपनीचे 20 गॅस सिलेंडर टाकी, एक रिफिलिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, एक रिक्षा वाहन असे 46 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून बाजारपेठ पोलीस ठाणे येथे जमा केला आहे. तसेच गॅस रिफिलिंग कारवाई मधील रिक्षा बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या आवारात लावली आहे. तर दुसरी कारवाई शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये यावल रोडवरील बल्लू गॅरेज समोर सार्वजनिक जागी पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 5 गॅस सिलेंडर टाक्या, एक रिफिलिंग मशीन असे साहित्य जप्त करून शहर पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे. दोन्ही पोलीस ठाण्यात कारवाईचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.



