जळगाव,

जळगाव शहरात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. पिंप्राळा भागातील संत मिराबाई नगर येथे राहणाऱ्या एका महिला व्यापाऱ्याची २ लाख ३४ हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा येथील संत मिराबाई नगरात कांचन सुरेश येवले (वय ३८) या आपल्या परिवारासह राहत असून पशूखाद्य खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. संशयित आरोपी गोरख कैलास दुधरे रा. गल्ले बोरगाव ता. खुलताबाद जि. छत्रपती संभाजी नगर याने महिलेशी संपर्क साधून विश्वास संपादन करून सांगितले की, मला व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडून १७० पशूखाद्याच्या गोण्या तुमच्या कडील ट्रकमध्ये पाठवून देण्याचे सांगितले. त्यानुसार महिलेने विश्वास ठेवून दिलेल्या ऑर्डरप्रमाणे २ लाख ३४ हजार रूपये किंमतीच्या १७० पशूखाद्याच्या गोण्यांनी भरलेला ट्रक स्वत जावून त्यांनी पोहवून दिला.
दिलेल्या ऑर्डरप्रमाणे पैसे न देता महिला व्यापारी यांची फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सोमवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोरख कैलास दुधारे रा. गल्ले बोरगाव ता.खुलताबाद जि.छत्रपती संभाजी नगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहे.


