सतर्क ट्रॅकमॅनच्या प्रसंगावधानामुळे जळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशाचे वाचले प्राण ;

भुसावळ – जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकमॅनच्या सतर्कतेने व तत्परतेने एका प्रवाशाचे प्राण वाचवले. ही घटना दिनांक 25.12.2024 रोजी सकाळी 11 वाजता, ट्रेन क्रमांक 12833 (अहमदाबाद -हावडा) जळगाव स्थानकावरून सुटत असताना घडली.

गाडी जळगाव स्थानकावरून सुटत असताना, B 5 कोचच्या दरवाजाजवळ एक प्रवासी लटकत होता. प्रवाशाचे पाय ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या दरम्यान फसले होते व त्याला घसरत जाताना पाहून इंजिनिअरिंग विभागातील ट्रॅकमॅन गजानन बाबूसिंह पाटील, युनिट क्रमांक 12, जळगाव यांचे लक्षात आली व त्यांनी त्वरित धाव घेत प्रवाशाला सुरक्षित बाहेर ओढून त्याचे प्राण वाचवले.

घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बल (RPF) चे एएसआय शिवपूजन सिंग यांनी प्रवाशाची चौकशी केली. प्रवाशाचे नाव प्रकाश रामचंदानी (वय 58 वर्षे) असून ते नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असल्याचे सांगितले. . रामचंदानी यांनी जळगाव ते नांदुरा प्रवासासाठी पास घेतला होता.

त्यांना तातडीने वैद्यकीय तपासणीचा सल्ला देण्यात आला, परंतु त्यांना कोणतीही शारीरिक अस्वस्थता वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांची प्रवासाची गाडी सुरू ठेवण्यात आली.

रेल्वे प्रशासनाने ट्रॅकमॅन . गजानन बाबूसिंह पाटील यांच्या या साहसिक व तत्परतेच्या कार्याचे कौतुक केले आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अपघात टळला असून प्रवाशांचा रेल्वेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले की प्रवासादरम्यान नियमांचे पालन करा व डब्याच्या दरवाज्यात उभे राहून प्रवास करण्याचे टाळा. आपली सुरक्षितता हीच रेल्वेची प्राथमिकता आहे.