भुसावळ – रेल्वे प्रवासात बर्थच्या कोपर्याचा भाग लागून गंभीर दुखापत झालेल्या शहरातील प्रवाशाने रेल्वे व विमा कंपनीच्या विरोधात ग्राहक मंचात दावा दाखल केला. या दाव्याची सुनावणी 27 डिसेंबरला होणार आहे. यापूर्वीच सबंधीत विमा कंपनीने तक्रारदार प्रवाशाला चार लाख रुपयांचा विमा संरक्षीत रक्कम मंजूर केली आहे. तक्रारदार प्रवाशांने रेल्वेचे आरक्षीत ई तिकिट काढले होते. या तिकिटावर 45 पैशात विमा संरक्षण असल्याने हा लाभ मिळाला आहे.
भुसावळ येथील मूळ रहिवासी आशिष इंदरकुमार जेठानी (रा.सिंधी कॉलनी) हे भुसावळ येथून मुंबई येथे उपचारासाठी 30 मार्च 2024 रोजी ट्रेन क्रमांक 12154 ने भुसावळ ते लोकमान्य टिळक प्रवास करीत होते. चाळीसगाव येथे प्रवासी सीटचा कोना आशिष जेठानी यांच्या गुडघ्याला लागल्याने अतिगंभीर स्वरूपाची दुखापत झाली. चाळीसगाव येथे उपचाराची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आशिष जेठानी यांचे वडील व इतर कौटुंबिक सदस्यांनी या अपघाताची नोंद उपस्टेशन प्रबंधक, चाळीसगाव रेल्वे स्टेशन, व जी.आर.पी. पोलीस स्टेशनला करीत भुसावळ येथे जखमी आशिष यांना आणत भुसावळातील साईपुष्प हॉस्पीटलमध्ये उपचार केले. या दुखापतीमुळे आशिष जेठानी यांना कायमस्वरूपी अपंगत्व आले. उपचारादरम्यान त्यांना अंदाजे साडे चार लाख रुपये खर्च आला. आशिष जेठानी यांनी रेल्वे प्रवासासाठी आय.आर.सी.टी.सी. कडून ई-आरक्षित तिकीट खरेदी केले होते. या ई- आरक्षित तिकीटावर 45 पैसे अतिरिक्त घेवून त्याव्दारे विमा संरक्षण देण्यात आले होते
तिकिटासोबतच्या विमा पॉलीसीत रॉयल सुंदरम विमा कंपनी, चेन्नई यांनी प्रवासादरम्यान अपघात झाल्यावर कायम अपंगत्व झाल्यावर रक्कम दहा लाख देण्याचे वचन दिले असल्याने आशिष जेठानी यांनी रॉयल सुंदरम विमा कंपनीला नोटीस दिली. सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. दावा मान्य होत नसल्याने या कारणाने व्यथित होवून आशिष जेठानी यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, जळगाव यांच्याकडे आय.आर.सी.टी.सी. नई दिल्ली व रॉयल सुंदरम विमा कंपनी यांना प्रतिवादी करून तक्रारी अर्ज दाखल केला. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, जळगाव यांनी प्रतिवादीला नोटीस काढली. पुढील सुनावणी 27 डिसेंबरला निश्चित केली असतांना व ग्राहक तक्रारी अर्ज प्रलंबित असतांना सुनावणी नोटीस कंपनीला मिळाल्यावर रॉयल सुंदरम विमा कंपनी यांनी तक्रारदाराला चार लाखांचा दावा मंजूर केला आहे. त्याबाबत ई-मेल पाठवून रद्द केलेला धनादेश व पॅन कार्डची झेरॉक्स मागवण्यात आली आहे. या प्रकरणात जखमी आशिष जेठानी तर्फे अॅड.राजेश एस.उपाध्याय, अॅड.मनिष डी.जुमनानी व अॅड.अभिजीत ओक हे बाजू मांडत आहे.



