इगतपुरी-भुसावळ मेमू ट्रेन मध्ये महिलेची प्रसूती ; महिला व बाळ सुखरूप ;

चाळीसगाव:

इगतपुरी येथून भुसावळ कडे जाणाऱ्या मेमू ट्रेन मध्ये 22 वर्षीय महिलेची प्रसूती झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी घडली असून या महिलेने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला आहे.महिला आणि त्याच्या बाळाला रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने चाळीसगाव रेल्वे स्थानकातून शासकीय ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पूजा अंकुश चव्हाण वय 22 वर्ष रा . अंधारी तालुका चाळीसगाव येथील महिला आणि तिचे इतर दोन जवळचे नातेवाईक हे नाशिक जिल्ह्यातील खेरवाडी येथून चाळीसगावला येण्यासाठी खेरवाडी स्थानकावरून इगतपुरी भुसावळ मेमू ट्रेन मध्ये बसले होते. दरम्यान चालत्या ट्रेन मध्ये महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्याने. मेमू गाडीने प्रवास करणारे डॉ.प्रतीक चौधरी व इतर महिलांच्या सहाय्याने ही प्रसूती सुखरुपपणे करण्यात आली.पूजा यांनी गोंडस कन्येला जन्म दिला.

याबाबत चाळीसगावच्या उपस्टेशन प्रबंधक यांना दुपारी दोन वाजता सूचना मिळाली त्यांनी रेल्वे सुरक्षा बल विभागाचे उपनिरीक्षक पी.डी.पाटील यांना कळविले.पाटील यांनी तत्काळ सहायक उपनिरीक्षक राजकुमारी भावसार यांना चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर बोलविले. मेमू रेल्वे दुपारी २ वाजून १० मिनिटांनी चाळीसगाव स्थानकावर आली.

त्यावेळी सहायक उपनिरीक्षक भावसार व डॉ.प्रतीक चौधरी व इतर महिलांच्या सहाय्याने पूजा चव्हाण यांना गाडीतून उतरविले. यानंतर नवजात बाळासह मातेला येथील चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.रेल्वे सुरक्षा बल विभागाचे व्ही. के.पांडे,संदीप पाटील यांनी ही मदत केल्याने आई व बाल सुखरूप असून बाळाचे वजन २ किलो ६०० ग्रॅम आहे