भुसावळ – साकेगावातील श्री स्वामी नारायण गुरूकुलमधील श्री स्वामी नारायण गुरूकुलचे सचिव तथा स्वामी ऋषीस्वरूपादास महाराज (28) यांनी गुरूकुलमधील त्यांच्या राहत्या खोलीत छताला दोर बांधून गळफास घेतला. ही घटना शनिवारी पहाटे सहा वाजता उघडकीस आली. महाराजांनी केलेल्या आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

गुरुकुलमध्येच वास्तव्य
जळगाव रोडवरील श्री स्वामी नारायण गुरूकुल येथे राहात असलेले स्वामी ऋषीस्वरूपादास हे शनिवारी गुजराथमधील वडताल येथे मोठ्या स्वामीसोबत जाणार होते. स्वामी ऋषीस्वरूपादास यांनी शुक्रवारी रात्री 2 वाजेपर्यत शाळेच्या आवारात गस्त केली. सर्वत्र लक्ष ठेवले. शनिवारी सकाळी गुजराथमध्ये जाण्यासाठी गाड्या तयार झाल्यात. जळगाव येथे सुरू असलेल्या स्वामी नारायण महोत्सवासाठी आलेले स्वामी के.के. शास्त्री महाराज व अन्य महाराज येथे आले होते, ते गुजराथमध्ये जात होते, त्याच्या सोबत स्वामी ऋषीस्वरूपादास महाराज सुध्दा जाणार होते. त्यामुळे त्यांना सकाळी आवाज दिला मात्र त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही, दोन ते तीन वेळा आवाज दिल्यावर काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने थेट वरती जाऊन पहाणी केली. यावेळी दरवाजा ठोकला मात्र, काहीही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्या खोलीची खिडकी उघडली असता, आत स्वामी ऋषीस्वरूपादास यांनी गळफास घेतल्याचे दिसल्याने एकच धावपळ उडाली.


