मुंबईत नव्हे तर नागपूरात होणार मंत्र्यांचा शपथविधी ! –

नागपूर -राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी मुंबईऐवजी नागपूरात होण्याची शक्यता आहे. रविवार, 15 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता नागपुरातील राजभवनात हा सोहळा होईल.
भाजपला 20 ते 22, शिंदेसेनेला 10 ते 12 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 8 ते 10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. राज्यपाल 15, 16 आणि 17 डिसेंबर रोजी नागपूर दौर्‍यावर असून त्यांचा अधिकृत दौरा शनिवारी जाहीर झाल्यानंतर शपथविधीबाबत घोषणा होईल.

राष्ट्रवादीत या चेहर्‍यांना संधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातून छगन भुजबळ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, अनिल पाटील या विद्यमान मंत्र्यांची नावे कायम राहतील. दिलीप वळसे पाटील यांनी आधीच नकार कळवला आहे तर हसन मुश्रीफ यांचा पत्ता कट होवू शकतो. नरहरी झिरवाळ, दत्ता भरणे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रिमंडळातील उदय सामंत, शंभूराजे देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील ही नावे कायम ठेवली आहेत तर प्रवक्ते संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर या नव्या चेहर्‍यांना संधी देण्याचे संकेत आहेत. संजय राठोड, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांच्या नावावर शंका आहे.
भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांची नावे मित्र मंडळाच्या यादीत अग्रक्रमांकावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. मराठवाड्यातील दुसर्‍या महिला मेघना बोर्डीकर, लातूर जिल्ह्यातील संभाजी पाटील निलंगेकर, डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, परिणय फुके व संजय कुटे यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगितले जाते. भाजपने काही नव्या चेहर्‍यांना संधी देताना जुन्यांचा पत्त कट करण्याचे ठरवले आहे.