जळगाव – नवीन इनोव्हा क्रिस्टा ही कार खरेदी करुन मूळ कार मालकाला रक्कम न देता फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात रविवार, 8 रोजी पुणे येथील राकेश सुभाष बडगुजर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

विक्रम रमेश मुनोत (42, रा.गणपतीनगर, जळगाव) हे व्यावसायीक आहेत. त्यांच्याकडे नवीन इनोव्हा क्रिस्टा कार होती. ही कार खरेदीसाठी राकेश बडगुजर (रा.आकुर्डी, जि.पुणे) यांनी तयारी दर्शविली. त्यानुसार तीन लाख 25 हजार रुपयात ही कार विक्रीचे ठरले. 29 एप्रिल 2023 रोजी ही कार खरेदी करुन संशयिताने कार ताब्यात घेतली. त्यानंतर ठरलेली रक्कम राकेश बडगुजर यांनी विक्रम मुनोत यांना दिली नाही. या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुनोत यांच्या तक्रारीनुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात रविवार, 8 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र तावडे करीत आहेत.


