भुसावळ- – भुसावळ शहरातील सोमनाथ नगरात राहणारे एका ६४ वर्षीय जेष्ठ दाम्पत्याचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २८ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या चोरट्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. चोरटा हा वृद्धाचा जावईच निघाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान कर्जबाजारातून त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आज सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली . राजेंद्र शरद झांबरे रा. फेकरी ता. भुसावळ असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील सोमनाथ नगर परिसरामध्ये अनिल हरी बऱ्हाटे वय-६४ हे आपल्या पत्नी ( सेवानिवृत्त शिक्षिका ) सह वास्तव्याला आहे. सोमवारी २ डिसेंबर रोजी त्यांच्या पुतण्याचे लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम असल्याकारणामुळे बऱ्हाटे दाम्पत्य दुपारी २ वाजता घर बंद करून हळदीच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी संशयित आरोपी राजेंद्र झांबरे हा देखील हळदीच्या कार्यक्रमात होता. त्याने बाहेर जाऊन येतो असे सांगून तो थेट सासरे अनिल बऱ्हाटे यांच्या घरी गेला. त्याने घराच्या मागची खिडकीची लोखंडी गज कापून घरात प्रवेश करत घरात बाथरूममध्ये असलेल्या अडगळीत ठेवलेल्या खलबत्त्यामधून व घरातील कपाटातून ३३ तोळे सोन्याचे दागिने आणि २ लाख ६० हजार रुपयांची रोकड असा एकूण २८ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या संदर्भात पोलिसांनी खोलवर चौकशीला सुरुवात केली. यामध्ये दाम्पत्याचे जावई संशयित आरोपी राजेंद्र झांबरे हा कर्जबाजारी झालेला होता, अशी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अधिक चौकशी केली व राजेंद्र झांबरे याला ताब्यात घेतले. त्याला खाकीचा हिसका दाखवताच जावई घडाघडा बोलू लागला व सासऱ्याच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेले संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विजय नेरकर, निलेश चौधरी, रमण सुरळकर उमाकांत पाटील, पोलीस नाईक सोपान पाटील, प्रशांत परदेशी, भूषण चौधरी, राहुल वानखेडे, योगेश माळी, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शहा यांनी केली आहे.


