मुंबई,

महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही सुधारलेली नाही. एकनाथ शिंदे हे दरे या त्यांच्या मूळगावी गेले होते तेव्हा त्यांची तब्येत बिघडली होती. यानंतर ते मुंबईत परतले होते. तरी त्यांची प्रकृती सुधारली नव्हती. सोमवारी रात्री भाजप नेते गिरीश महाजन त्यांना भेटायला आले तेव्हा देखील एकनाथ शिंदे यांना सलाईन लावण्यात आली होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारेल आणि ते मुंबईत येऊन बैठकांना हजेरी लावतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मंगळवारी सकाळी हाती आलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांची तब्येत अद्यापही ठीक नसून त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत आहे. त्यामुळे त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली होती. मात्र, या दोन्ही चाचण्या नेगेटिव्ह आल्या आहेत. मात्र, पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटी बायोटिक औषधे सुरु आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सध्या अशक्तपणा जाणवत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. परंतु, डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना तुर्तास आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ज्युपिटर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.


