गॅस सिलेंडरचा स्फोट : आगीत चार घरे जळून खाक :

जळगाव – शहरातील खेडीतील आंबेडकर नगरात एका घरामध्ये आग लागल्याने घरघुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना काल दि. १२ रोजी घडली. यात नजीकची चार पार्टेशनची घरे जळून खाक झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आह. सदर घटना सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. या आगीत चार कुटुंबांची संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून चार कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. महानगरपालिकेच्या दोन अग्निशमन बंबाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. रस्त्यावरील गल्लीत अंधार आणि रस्ते कमी रुंदीचे असल्याकारणामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, कार्तिक एकादशीच्या निमित्ताने जळगाव शहरात श्रीराम रथोत्सव असल्याने रथोत्सव पाहण्यासाठी खेडी शिवारातील आंबेडकर नगरातील जवळजवळ राहणारे चारही कुटुंब हे रथोत्सव पाहण्यासाठी मंगळवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता गेलेले होते. दरम्यान सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एका पार्टेशनच्या घरात अचानक आग लागली. या आगीमुळे घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. बघता बघता एकापाठोपाठ असे चारही पार्टेशनच्या घरांना भीषण आग लागली.

दरम्यान आग लागल्यानंतर काही नागरिकांनी व तरुणांनी शेजारी राहणाऱ्या काहींच्या घरातील गॅस सिलेंडर उचलून थेट नाल्यात फेकून देण्यात मदत केली. तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनांसाठी दाखल झाले. परंतु यावेळी रस्ते अरुंद आणि अंधार असल्या कारणामुळे वाहन जाण्यास मोठी अडचण झाली. शेवटी तरुण व नागरिकांच्या मदतीने ही आग विझवण्यास मदत झाली. तोपर्यंत चारही घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले आहेत.

चारही घरांना आग लागल्यानंतर या घटनेची माहिती मिळताच आ. राजूमामा भोळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच चारही कुटुंबांला धीर देत आमदार राजूमामा भोळे यांनी घरे बांधून देण्याबाबतचे आश्वासन दिले. तसेच चारही कुटुंबांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था आमदार राजूभोळे भोळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.