नाशिक : ऐन दिवाळीच्या सणात बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना गिरणारे शिवारातील साडगाव येथे घडली आहे. भाऊबीजेच्या दिवशीच सक्ख्या भावाने आपल्या वयोवृद्ध बहिणीला आणि मेहुण्याला शेतीच्या वादातून जीवे ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास ग्रामीण पोलिसांनी लावत निर्दयी भावाला गजाआड केले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गिरणारे शिवारातील साडगाव येथे डोक्यात, बरगडीला जबर मारहाण वृध्द दाम्पत्याच्या दुहेरी खुनाची घटना बुधवार दि. ६ रोजी सकाळी उघड झाली होती. या दुहेरी खुनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. साडगाव शिवारात रामु राधो पारधी, ७० आणि त्यांची पत्नी चंद्रभागा रामु पारधी, ६५ हे दोघे मोलमजुरी करून आपली गुजराण करीत होते. त्यांना कोणतेही अपत्य नसल्याने घरात ते दोघे एकटेच राहत होते. त्यामुळे अचानक त्यांची हत्या का करण्यात आली याचा कोणालाही उलगडा होत नव्हता.
दुहेरी खुनाचे गांभीर्य बघता ग्रामीण पोलीस दल ॲक्शन मोडवर आले होते. याबाबत ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकरी हरिष खेडकर यांनी घटनास्थळास भेट देवून पाहणी केली करीत अधिकाऱ्यांना पुढील तपासासाठी सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजीत आमले यांनी घटनास्थळ परिसरात आणि मयतांच्या नातेवाईकांकडे बारकाईने चौकशी सुरु करत त्यांच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती. दरम्यान ४८ तास पाळत ठेवल्यानंतर संशयीत सोमनाथ सावळीराम बेंडकोळी, ५०, रा. लाडची शिवार, ता. जि. नाशिक याला त्याच्या संशयित हालचालीवरून ताब्यात घेण्यात आले.
सोमनाथ बेंडकोळी याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. संशयित आरोपी सोमनाथ बेंडकोळी हा मयत महिला चंद्रभागा रामु पारधी यांचा सख्खा भाऊ असून जमिनीच्या वादातुन त्यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्याचाच त्याचा राग मनात धरून सोमनाथ याने भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास लाकडी दांडक्याने बहीण आणि मेव्हण्याला अमानुष मारहाण करून जिवे ठार मारल्याची कबुली दिली आहे. त्याच्या कबुली जबाबीवरून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार, सपोउनि नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, पोहवा संदिप नागपुरे, मेघराज जाधव, सचिन देसले, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, चापोअं. रविंद्र गवळी यांच्या पथकाने केली आहे.


