मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती आवश्यक – निवडणूक निरीक्षक राजेश कुमार ;

भुसावळ – भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात जनरल निवडणूक निरीक्षक राजेशकुमार यांनी मिटींग हॉलमध्ये अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
विधानसभा सार्वत्रीक निवडणुकीच्या दृष्टीने विधानसभा मतदार संघासाठी जनरल निवडणूक निरीक्षक म्हणून राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भुसावळ विधानसभा मतदार संघ निवडणूक कार्यालयातील तापी सभागृहात आढावा बैठक दुपारी घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्यात हे सांगितले.

गृह मतदान कक्ष (होम वोटिंग) नमुना 12 ड याबाबतची माहिती घेतली. वोटर स्लीपचे बी.एल.ओ.मार्फत शंभर टक्के वाटप करून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे, जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल, असे त्यांनी सांगितले. बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र फातले तसेच निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर उपस्थित होते. निवडणूककामी नियुक्त सर्व नोडल अधिकारी, सेक्टर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.