भुसावळ : भुसावळ तालुक्यातील अन्न सुरक्षा योजनेच्या यादीची चौकशी करावी, त्यातील अपात्र व्यक्तींची नावे कमी करून गरजू, पात्र, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित, अंध, अपंग व निराधार व्यक्तींची नावे समाविष्ट करावीत तसेच अन्य विविध न्याय मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी दोन ते दोन या वेळेत निळे निशाण संघटनेतर्फे संस्थाध्यक्ष अध्यक्ष आनंद बाविस्कर व भुसावळ तालुकाध्यक्षा निकिता भावटे यांच्या नेतृत्वात भुसावळ तहसील कार्यालयाबाहेर निदर्शन आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आले.
भुसावळ तालुका स्तरावरील रुग्णालय व गाव पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या महिलांच्या उपचारार्थ तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी, ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी सिजर करण्याची आवश्यकता भासल्यास तत्काळ सीजर करण्यास कायस्वरूपी तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी, भुसावळ तालुक्यातिल औद्योगिक वसाहतीत असलेल्या खाजगी कंपनीत तसेच वीज निर्मिती केंद्रात परप्रांतातून पोट भरण्यास आलेल्या कंत्राटी स्वरूपाच्या कामगारांची कंत्राटदार यांच्याकडून होत असलेली पिळवणूक थांबवावी, नगरपालिका हद्दीत व ग्रामीण भागात काही स्वार्थी व्यक्तींनी महसुल विभागाची दिशाभूल करून शासनाच्या नियम अटींचे उल्लंघण करीत मूलभूत सुविधा न देता प्लॉट विक्री केल्याने बेकायदेशीर कृत्य करणार्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. भुसावळ पालिका व महसूल प्रशासनाने आठ दिवसात समस्या न सोडवल्यास बुधवार, 28 ऑगस्ट 2024 रोजी ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
संघटनेच्या महिला आघाडी जळगाव जिल्हा अध्यक्षा नंदा भावटे, भुसावळ तालुकाध्यक्षा निकिता भावटे, तालुका उपाध्यक्षा मनीषा लोखंडे, तालुका संपर्क प्रमुख मंदा साळवे, फैजपूर विभागाचे उपाध्यक्ष अनिल इंधाटे, ईकबाल तडवी, यावल तालुकाध्यक्ष विलास तायडे, रावेर तालुकाध्यक्ष चंद्रकात सोनवणे, जळगाव तालुकाध्यक्ष गीता वाघ, यावल तालुका युवक अध्यक्ष सागर तायडे, यावल तालुका कार्याध्यक्ष मनीषा बागुल, सल्लागार विजया सोनवणे व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



