महाराष्ट्र व जर्मनीत सामंजस्य करार : जिल्हास्तरावर 25 विद्यार्थ्यांसाठी एक वर्ग

भुसावळ – महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देणेबाबत सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत जिल्हास्तरावर 25 विद्यार्थ्यांसाठी एक वर्ग घेण्यात येणार आहे. यामुळे जर्मनीत रोजगाराच्या संधी मिळण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग व पुढील कामकाजाची दिशा ठरविण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अनुषंगाने जर्मन भाषा शिकविण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्यूट, मॅक्स्म्युलर भवन, पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जर्मन भाषा शिकविण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर 25 विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमाणे 10 हजार विद्यार्थ्यांसाठी 400 प्रशिक्षण वर्गांची आवश्यकता आहे. सदर प्रशिक्षण वर्ग सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात असल्याने 200 प्रशिक्षण वर्ग सुरू करणे प्रस्तावित आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी जर्मन भाषेची अर्हता बीए जर्मन, एमए जर्मन व ग्योथे इन्स्टिट्यूट यांच्याद्वारे घेण्यात येणारी स्तरनिहाय ए1, ए2, बी1, बी2, सी1, सी2 उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील नियमित शिक्षकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण वर्ग शासनामार्फत मोफत सुरू करणे प्रस्तावित आहे. तसेच शासन निर्णयानुसार जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पात्र व कुशल युवकांनी एससीईआरटीच्या वेबसाईटवर आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांनी केले आहे.
चौकट –
जर्मनीला नोकरी व रोजगारानिमित्त जाणाऱ्या कुशल मनुष्यबळाला जर्मन भाषा शिकविण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तसेच जर्मन भाषा शिकविण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षकांची आवश्यकता असल्याने शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या इच्छुक शिक्षकांनाही ही संधी उपलब्ध आहे. त्याचा शिक्षकांनी लाभ घ्यावा.
- डॉ.अनिल झोपे,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव


