भुसावळ येथे १७ ऑगष्ट रोजी जागतिक धावपटू आशिष कासोदेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन”

भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे आय.एम.ए. हॉल, सहकार नगर येथे दिनांक १७ ऑगष्ट शनिवार रोजी संध्याकाळी ठिक 6.30 वाजता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद असलेले प्रसिद्ध धावपटू व सायकलपटू आशिष कासोदेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

आशिष कासोदेकर हे संपूर्ण देशात अल्ट्रा रनर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत लदाख येथील अतिशय विषम वातावरणात 2017 मध्ये 111 किमी, 2018 मध्ये 333 किमी व 2019 मध्ये 555 किमी धावण्याचा विक्रम केलेला आहे. लद्दाक येथे 500 किमी धावणारे ते केवळ एकमेव भारतीय धावपटू आहेत. हा विक्रम त्यांनी 126 तास व 18 मिनिटात पूर्ण केलेला आहे. त्यानंतर त्यांनी 2020 साली ब्राझील येथे 44 तासात 217 किमी धावून आपल्या भारताचे नाव जगात उंचावलेले आहे. त्यानंतर 2021 मध्ये कॅलिफोर्निया येथे 38 तास सतत धावून 135 किमी ज्या मॅरेथॉनला बॅड वॉटर 135 असे म्हणतात ती देखील त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यानंतर 2022 मध्ये लागोपाठ 60 दिवस 42 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन पुणे विद्यापीठाच्या परिसरात धावून त्यांनी आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवलेले आहे. असे करणारे संपूर्ण जगातील ते एकमेव पुरुष धावपटू आहेत. त्यानंतर 2023 मध्ये कुट्टूनाद ते ओमलिंग ला जो देशातील समुद्रसपाटीपासून सर्वात खाली ते समुद्रसपाटीपासून सर्वात उंच असा हा प्रवास त्यांनी 76 दिवस सतत धावून पूर्ण केलेला आहे. असे जगप्रसिद्ध धावपटू भुसावळ शहरात दाखल होत असून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्व धावपटू व सायकलपटूंनी घ्यावा असे आवाहन भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा. प्रवीण फालक यांनी केले आहे.