भुसावळ : भुसावळच्या तहसीलदार निता लबडे यांची 2023-24 या आर्थिक वर्षातील सर्वोत्कृष्ठ तहसीलदार म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी व निवड समिती अध्यक्ष अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी व निवड समिती सदस्य गजेंद्र पाटोळे, निवड समिती सदस्य सचिव विजय सूर्यवंशी यांनी निवड केली आहे. स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. 3 जुलै 2023 रोजी भुसावळची धुरा तहसीलदारांनी घेतल्यानंतर त्यांच्यापुढे अनेक आव्हाने होती मात्र सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी कामकाजाला सुरूवात करीत कामांवर भर दिला व त्याचे फलित म्हणून जिल्हा निवड समितीतर्फे त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

डिजिटल क्रॉप सर्वेत महाराष्ट्रात भुसावळ प्रथम
तहसीलदारांच्या कार्यकाळात शंभर टक्के ई चावडी, शंभर टक्के ऑनलाईन वसुली, शंभर टक्के ई डेटा बल्क सायनिंग करणे, शंभर टक्के ई पीक पाहणी, ई फेरफारचा कालावधी कमी करणे, संजय गांधी योजनेची बैठक घेवून लाभार्थींना लाभ देणे, विधवा, दिव्यांग, परित्यक्त्या, अती गरीब नागरिकांना धान्याचा लाभ देणे, शेतकर्यांसाठी शेत-शिवार व पांदन रस्ते मोकळे करणे, महसुली प्रकरणांचा मुदतीत निपटारा करणे तसेच डिजिटल क्रॉप सर्वे पायलट प्रोजेक्ट भुसावळ तालुक्याची निवड झाल्यानंतर हे काम उन्हाळी हंगामात सर्वात आधी वेगाने शंभर टक्के पूर्ण करणारा महाराष्ट्रातील पहिला तालुका भुसावळ ठरला.
पुरस्काराचे श्रेय सर्व सहकार्यांना : तहसीलदार
जळगव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शाखाली पारदर्शी कारभारासह सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून काम सुरू आहे. भुसावळ तहसीलमधील सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, कोतवाल, तलाठी, महसूल सहाय्य्यक यांच्या सहकार्याने चांगले काम करता आले व पुरस्काराचे श्रेयदेखील त्यांचे आहे. यापुढेही आणखी चांगले काम करण्याचा प्रयत्न असेल, असे तहसीलदार निता लबडे यांनी सांगितले.


