भुसावळला येत्या रविवारी रानभाजी महोत्सव : विविध रानभाज्या एकाच ठिकाणी खरेदी करण्याची संधी :


भुसावळ, ता. १२ : येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या प्रांगणात येत्या रविवारी (ता. १८) रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने एकाच ठिकाणी विविध रानभाज्या खरेदी करण्याची संधी भुसावळकरांना मिळणार आहे.
महोत्सवाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व आयुर्वेद व्यासपीठ यांच्या तर्फे करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा तिसरे वर्ष असुन रानभाज्या खरेदी साठी व महत्त्व जाणून घेण्यासाठी लोक महोत्सवाची आतुरतेने वाट पहात असतात. जिल्ह्यातील रानभाज्या विक्रेते येथे येतात. याव्यतिरिक्त मध, गिरगाईचे तुप, मशरुमचे वडे, भजे आदींचेही स्टॉल असतात. सध्या पावसाळी वातावरण असल्याने मोठ्या प्रमाणात रानभाज्यांचे उत्पादन झाले आहे. शिवाय या भाज्या रासायनिक फवारणी पासुन मुक्त असल्याने आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्वपूर्ण असतात. तरी निसर्गाच्या अनमोल मेवा निरामय आरोग्यासाठी घेता यावा म्हणून रविवारी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन रेल सिटीचे अध्यक्ष विशाल शाह, सचिव अनिल सहानी, प्रकल्प प्रमुख श्रीकांत जोशी, सह-प्रकल्प प्रमुख हरमीतसिंग माखन, तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे, इनरव्हीलच्या अध्यक्षा मिनाक्षी धांडे, सचिव किरण जावळे, आयुर्वेद व्यासपीठाचे अध्यक्ष वैद्य राहुल पांडे, सचिव हेमंत धर्माधिकारी यांनी केले आहे.

————-