बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू ‘ जामनेर तालुक्यातील घटना :

जामनेर – ,

कौटुंबिक वादामुळे पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील गोद्री येथे घडली आहे. काजल विशाल चव्हाण (वय २४) असं मयत महिलेचे नाव असून याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील गोद्री येथे काजल ही पती विशाल, सासू-सासरे यांच्यासह राहत होती. काही महिन्यांपूर्वीच विशाल आणि काजलचा विवाह झाला होता. गेल्या अनेक दिवसापासून दोघं पती-पत्नीमध्ये कौटुंबिक विषयावरून वादविवाद होते. हे वाद मिटवण्यासाठी कुटुंबातील काही सदस्यांनी प्रयत्न देखील केला होता. मात्र रविवार रात्री दोघांचा वाद विकोपाला गेला. त्यानंतर विशालने संतप्त होऊन काजलच्या तोंडावर, नाकावर, दांड्याने आणि इतर धारदार वस्तूने मारहाण केली. या मारहाणीमध्ये काजल ही जागीच गंभीर जखमी झाली.

दरम्यान ग्रामस्थांनी जखमी काजलला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तेथे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. यावेळी काजोलच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसांनी पती विशाल याला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे