भुसावळ : भुसावळ गावालगत नशिराबाद-बोदवड रस्त्यावर ओमनी गाडीवर राखेने भरलेला डंपर मागून आदळल्याने ओमनी गाडीचा अक्षरशा चुराडा झाला. सुनसगाव, गोंभी व नागरीकांनी धाव घेतल्याने ओमनीतील पाच प्रवाशांचे जीव वाचले. जखमींना गावातील तरुणांनी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. दरम्यान राखेचा डंपर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. शुक्रवारी सकाळी दहावाजेच्या दरम्यान हा अपघात घडला.
कोल्हाडी, ता.बोदवड येथील व बोदवड येथील पाच प्रवासी ओमनी (क्रमांक एम.एच.19 बी.जे.8517) या वाहनातून जळगाव येथे जात असताना या मार्गावर विल्हाळे, ता.भुसावळ येथून राखेचा डंपर (क्रमांक एम.एच.45 – 1245) जळगावकडे जात असताना ओमनीवर धडकला. या अपघातात ओमनीतील रामदास मोरे, कैलास सुशीर, प्रकाश सोनार, निना सुशिर व कोल्हाडी विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव बाविस्कर हे ओमनी गाडीत दाबले गेले. अपघात एवढा भीषण होता की ओमनी गाडीचा अक्षरशा चुराडा झाला. सुनसगाव व गोंभी येथील ग्रामस्थांनी व येणार्या जाणार्या वाहनधारकांनी विशेष म्हणजे तरुणांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने दोर व आसारी बांधून ओमनी गाडीतून प्रवाशांना बाहेर काढले. जखमी तिघांचे पाय फॅक्चर झाले तर दोन जणांना कमरेला मार लागला. भुसावळ तालुका पोलिसांना माहिती मिळताच सहा.निरीखक जनार्दन खंडेराव व पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, ओमनी गाडीत गॅस किट असल्याने अपघातानंतर गॅस लिकेजचा वास येत असल्याने स्फोटाच्या भीतीने धावपळ उडाली मात्र एकाने गॅस कनेक्शन बंद केले व नंतर ओमनी गाडी डंपर मधून जेसीबी मशीनच्या सहाय्याने काढण्यात आली. डंपर मालक बारामती येथील असल्याचे समजते. या मार्गावरुन राख व रेतीचे डंपर सुसाट वेगाने धावत असल्याने अपघात वाढले आहेत.



