भुसावळ – संपूर्ण जगात ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शक्य असेल तर मित्र एकमेकांना भेटतात किंवा फोन वर तरी बोलतात. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सदस्य देखील दर रविवार, मंगळवार व गुरुवारी सोबत धावण्याचा सराव करत असतात. शिवाय हे सर्व धावपटू देशभरातील विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये देखील एकत्र सहभाग नोंदवत असतात. त्यामुळे या सर्व धावपटूंमध्ये एक मैत्रीचे अतूट नाते तयार झालेले आहे. त्या अनुषंगाने भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे रविवारी मैत्री रनचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व धावपटू एकत्र १० किमी धावणार असून नेहमीच्या आपल्या धावपटू सहकाऱ्यांसोबत हातात हात घेऊन धावण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी सर्व धावपटूंनी शहरातील रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडील बाजूला असलेल्या श्रीकृष्णचंद्र हॉल शेजारी सकाळी ठीक ५.३० वाजता जमावे असे आवाहन भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा प्रविण फालक यांनी केले आहे.





